2018 मध्ये तिरुवनंतपुरममध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय सामना होणार होता. टीम इंडियाचा रवीझ कोवलम हॉटेलमध्ये थांबला होता. हॉटेल व्यवस्थापनाने टीम इंडियासाठी लग्झरी सी फूड तयार केले, मात्र कोहली त्यावेळी केवळ शाकाहारी अन्न खायचा. त्यामुळे त्याने सी फूड खाण्यास नकार दिला.
शेफने कोहलीकडे जाऊन त्याला विविध पदार्थांचा समावेश असलेली केरळची शाकाहारी मेजवानी खाण्याचा पर्याय सुचवला. यासाठी कोहली तयार झाला आणि शेफने त्याच्या टीमसोबत त्याच्यासाठी 24 शाकाहारी पदार्थ तयार केले. परंतु यावेळी केवळ एका व्यक्तीसाठी अन्न बनवणे कठीण असल्याने शेफच्या टीमकडून थोडे अधिकचे अन्न बनवले गेले.
जेव्हा शेफ स्वतः कोहलीला जेवण देण्यासाठी गेला तेव्हा विराटने उरलेल्या अन्नाचे काय होईल असा प्रश्न विचारला.
हॉटेलमधील लोकांना शिळे अन्न दिले जात नसल्याने उरलेले अन्न फेकून दिले जाईल, असे शेफने सांगितले. तेव्हा 700 रुपये प्रति लीटर दराचे पाणी पिणारा कोहली म्हणाला की, अन्न वाया जाऊ नये म्हणून हेच अन्न मी रात्री ही खाईन. मात्र, हॉटेलचे आणि बीसीसीआयच्या कडक नियमांनुसार कोणत्याही खेळाडूला शिळे जेवण देता येत नाही.
परंतु विराट कोहली त्याच्या निर्णयावर ठाम राहिला आणि शेवटी त्याने अन्न वाया जाऊ नये म्हणून रात्री शिळे अन्न खाल्ले. शेफने सांगितले की कोहलीने हे सर्व मनापासून केले, कोणाला दाखवण्यासाठी नाही आणि यामुळे स्टार फलंदाजाबद्दलचा त्यांच्या मनातील आदर अधिक वाढला.