

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. तर, दुसरीकडे मैदानाबाहेर विराट आपल्या कमाईमुळे सगळ्यात जास्त चर्चेत असतो.


डफ आणि फेलप्स ब्रँड व्हॅल्युएशनच्या अभ्यासानुसार सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत कॅप्टन कोहली भारताचा सर्वात मोठा ब्रॅण्ड आहे. सलग तिसऱ्यांदा विराट या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.


2019मध्ये विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू 39 टक्क्यांनी वाढली आणि आता ती 237.5 मिलियन डॉलर म्हणजेच 1691 कोटी रुपयांवर पोहचली आहे.


याबाबतीत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, शाहरुख खान आणि सलमान खान समवेत इतर सेलिब्रिटी आसपासही नाही आहेत. या यादीत सध्या दुसऱ्या क्रमांकावर अक्षय कुमार आहे.


भारतीय क्रिकेटपटूंबद्दल बोलायचे झाल्यास विराट कोहलीनंतर ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत माजी कर्णधार एमएस धोनी दुसर्या क्रमांकावर आहे. विशेष बाब म्हणजे त्याने मागील वर्षी जुलैपासून कोणताही सामना खेळला नाही.