आज व्हॅलेंटाईन डे जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भारतात मनोरंजन सृष्टीनंतर क्रिकेट हे सर्वात ग्लॅमर्स प्रोफेशन आहे. क्रिकेटपटूंच्या खासगी आयुष्याबद्दल त्यांच्या चाहत्यांना जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकतता असते. क्रिकेट विश्वातील अशाच एका अनोख्या लव्ह स्टोरी विषयी जाणून घेऊयात. ही लव्ह स्टोरी आहे, भारतीय क्रिकेट विश्वातील सर्वात वादग्रस्त क्रिकेटर श्रीशांत.
भारताचा माजी क्रिकेटर श्रीशांतची कारकीर्द अतिशय वादग्रस्त ठरली. श्रीशांतला टीम इंडियाचा बंडखोर खेळाडू म्हणूनही ओळखले जाते कारण तो कधीही आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही. भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शांताकुमारन श्रीशांत हा २०१३ मध्ये आयपीएल दरम्यान स्पॉट फिक्सिंगमध्ये गुंतला होता आणि त्याच्यावर खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. याच महिन्यात श्रीशांतचा विवाह जयपूरच्या राजकुमारीशी झाला. श्रीसंत आणि जयपूरच्या राजकुमाराची लव्ह स्टोरी खूपच रंजक आहे.
कारकिर्दीच्या सुरुवातीलाच श्रीशांत जयपूरला मॅच खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी श्रीशांत आणि जयपूरची राजकुमारी भुवनेश्वरी देवी यांची पहिली भेट एका दागिन्यांच्या दुकानात झाली होती. त्यावेळी श्रीशांत त्याच्या करिअरला सुरुवात करत होता आणि भुवनेश्वरी शाळेत शिकत होती. या पहिल्या भेटीचे प्रेमात कधी आणि कसे रूपांतर झाले हे श्रीशांत आणि भुवनेश्वरी या दोघांनाही कळले नाही. या दोघांचे अफेअर जवळपास 6 वर्षे चालले.
श्रीशांत आणि भुवनेश्वरी या दोघांचे कुटुंब या लग्नासाठी तयार नव्हते. परंतु या दोघांच्या प्रेमापुढे त्यांना नमावेच लागले. अखेर २०१३ मध्ये दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला परंतु यादरम्यान श्रीशांतवर आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगचा आरोप लागला.
श्रीशांतने एका मुलाखतीत सांगितले होते की, "बंदी घातल्यानंतर मला वाटायचे की मी पुन्हा खेळू शकेन की नाही. त्यावेळी मी आत्महत्येचा विचार करत होतो, मी माझ्या आई-वडिलांचा विचार करत होतो. मला वाटले की माझ्याशिवाय त्यांना आणखी 3 मुले आहेत, मी नसलो तरी ते जगतील. पण त्यावेळी भुवनेश्वरीच्या वडिलांनी मला सांगितले की भुवनेश्वरीला अजूनही तुझ्याशी लग्न करायचे आहे. मग विचार केला की लग्न केल्याशिवाय मी हे जग सोडू शकत नाही".
श्रीशांतने अखेर 12 डिसेंबर 2013 रोजी त्याच्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान असलेल्या भुवनेश्वरीशी लग्न केले. दोघांचे लग्न अतिशय शाही पद्धतीने झाले होते ज्यात देशातील अनेक बड्या व्यक्तींचा सहभाग होता. एकीकडे मॅच फिक्सिंगचे आरोप आणि दुसरीकडे लग्नाच्या अफवा, श्रीशांतसाठी तो काळ खूपच कठीण होता. परंतु त्या कठीण काळातही त्याच्या पत्नीने श्रीशांतची साथ सोडली नाही. एवढेच नाही तर श्रीशांतला तुरुंगात टाकल्यावर भुवनेश्वरी स्वयंपाकघरात झोपायची कारण श्रीशांतला तुरुंगात असताना ज्या त्रासाला सामोरे जावे लागले त्या सर्व त्रासांना तिला सामोरे जावेसे वाटत होते.
लग्नाच्या इतक्या वर्षांनी देखील श्रीशांत आणि त्याची पत्नी भुवनेश्वरी यांच्यामधील प्रेम तिळमात्रदेखील कमी झालेले नाही. श्रीशांतने गेल्यावर्षी २२ मार्च रोजी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. टीव्हीवरील अनेक रिऍलिटी शो मध्ये श्रीशांत दिसत असतो. तो सध्या त्याची पत्नी आणि 2 मुलांसह जीवन आनंदात जगात आहे.