भारतीय संघातील काही खेळाडू सध्या सततच्या क्रिकेटला कंटाळले आहेत. याबाबत कर्णधार विराट कोहलीने यावर चिंता व्यक्त करत लवकरच निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले होते. मात्र फक्त विराटचं नाही तर काही खेळाडू वाढत्या वयामुळं आणि दुखापतीमुळे निवृत्ती घेऊ शकतात.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आपल्या स्विंगसाठी ओळखला जातो. गेल्या काही वर्षांपासून भुवी एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही स्वरूपात खेळत आहे. मात्र, गेल्या 18 महिन्यांपासून दुखापतीमुळे वारंवार संघाबाहेर गेला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भुवनेश्वरला संघात संधी देण्यात आली असली तरी, त्याच्यावर काही दिवसांपूर्वी स्पोर्ट्स हार्मोनियाची शस्त्रक्रिया झाली होती. अशा परिस्थितीत तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. जानेवारी 2018 पासून त्याने कोणताही कसोटी सामना खेळलेला नाही.
भारतीय संघाचा सलामीवीर आणि गब्बर शिखर धवनही कसोटी स्वरूपाला निरोप देऊ शकतो. गेल्या वर्षभरात धवन सतत दुखापतींमुळे संघाबाहेर होता. 2019 मध्ये झालेल्या विश्वचषकानंतर प्रथम सय्यद मुश्ताक ट्रॉफी दरम्यान आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याला दुखापत झाली.
कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ यासारख्या खेळाडूंना संधी मिळत असल्यामुळं धवनला संघात पुनरागमन करणे फार कठीण आहे, अशा परिस्थितीत तो कसोटी क्रिकेटला रामराम करू शकतो.
एमएस धोनीच्या निवृत्तीची बरीच चर्चा आहे. गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक उपांत्य सामन्यात झालेल्या पराभवानंतर धोनी क्रिकेट खेळलेला नाही. केएल राहुल, ऋषभ पंत यांच्यासारख्या खेळाडूंना संघात स्थान मिळाल्यामुळे धोनीला टी-20 आणि एकदिवसीय सामन्यात कमबॅक करणे कठिण असेल.
कसोटीतून निवृत्त झालेल्या धोनीने अद्याप निवृत्तीची घोषणा केली नाही मात्र टी-20 वर्ल्ड कप 2020नंतर किंव आधी धोनी निवृत्ती घेऊ शकतो.
इशांत शर्मा कसोटी प्रकारात भारतीय संघातील महत्त्वपूर्ण गोलंदाजांपैकी एक आहे, तरी टी -20 संघात त्याचा पुनरागमन संभव नाही. 13 वर्षाच्या कारकीर्दीत तो दुखापतीमुळे बर्याच वेळा बाहेर पडला आहे आणि त्याच्या फिटनेसवरही परिणाम झाला आहे.
2018 मध्ये आयपीएल लिलावात त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते. इशांतने भारतीय संघासाठी टी-20 सामनेही कमी खेळलेले आहे. अशा परिस्थितीत तो लवकरच टी -20 स्वरूपाचा निरोप घेऊ शकतो.