जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या सिजनला सुरुवात झाली असून आयपीएलमधील मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात विजय मिळवून विजयाचे खाते उघडले.
परंतु याच दरम्यान मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव हा सलग 6 व्या सामन्यात चौथ्यांदा शुन्य धावा करून बाद झाला आहे. कधीकाळी आयपीएलचे मैदान गाजवणाऱ्या 'Mr 360' ने आयपीएल 2023 च्या तीन सामन्यात केवळ 16 धावा केल्या आहेत.
सूर्याला त्याच्या खराब फॉर्मवरून सध्या प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. मात्र अशातच आयसीसीकडून त्याच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
आयसीसीने बुधवारी टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुरुष फलंदाजीची टॉप रँकिंग जाहीर केली. यामध्ये सूर्यकुमारने आपले सर्वोच्च स्थान कायम ठेवले आहे.
या रँकिंगमध्ये सूर्यकुमार 906 रेटिंग सह प्रथम स्थानी आहे. तर त्याखालोखाल पाकचा मोहम्मद रिजवान 811 रेटिंग सह दुसऱ्या स्थानी तर पाक कर्णधार बाबर आजम 755 रेटिंगने तिसऱ्या स्थानी आहे.
सध्या सूर्या प्रथम स्थानावर विराजमान असला तरी लवकरच न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात पाच टी 20 मॅच खेळवल्या जाणार आहेत. यामुळे मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम हे चांगली कामगिरी करून सूर्याच्या प्रथम स्थान काबीज करू शकतात. तेव्हा यापुढे सूर्याला टी20 क्रिकेटमधील त्याची कामगिरी सुधारण गरजेचं असणार आहे.