सानिया मिर्झा आणि शोएब मलिक या दोघांचे लग्न 2010 मध्ये झाले होते. परंतु या दोघांच्या १३ वर्षांच्या संसारात कटुता येऊन दोघांचा घटस्फोट होऊन दोघे वेगळे राहात असल्याच्या बातम्या मागील अनेक दिवसांपासून समोर येत आहेत .
सानिया आणि शोएब या दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले असले तरी, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत कुटुंबाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर शोएब व्यक्त झाला.
ईदच्या निमित्ताने घेतलेल्या एका मुलाखतीत शोएब म्हणाला, "ईदच्या दिवशी एकत्र राहिलो असतो तर बरे झाले असते. पण कामामुळे आम्ही एकत्र नाही. आयपीएलशी निगडित सानियाचे काम सुरु आहे. होय, पण नेहमीप्रमाणेच प्रेम अजूनही आहे, परंतु मी त्यांना नक्कीच मिस करतोय. लग्नाआधी आपल्या कुटुंबातील सदस्यांना मिस करत असे आणि आता 2 कुटुंबे आहेत. पण अनेकदा कामामुळेअसे होत असते".
मुलगा इझानबाबत शोएब मलिक म्हणाला की, "त्याच्यावर आई आणि वडिलांकडून करिअरबाबत कोणताही दबाव नाही. दिवसातून दोनदा त्याच्याशी बोलणं होत. पण जर आपण त्याच्या इंटरेस्टच्या गोष्टी बोललो तरच तो बोलतो. नाहीतर अनेकदा मी नंतर बोलेन म्हणून फोन ठेऊन देतो. कधी मला पाहून मुलगा इझान म्हणतो की मी क्रिकेटर होणार आहे तर बायको सानियाला पाहून म्हणतो मी टेनिस खेळणार आहे. पण खरंतर बॅडमिंटन हा त्याचा आवडीचा खेळ आहे".
सानिया मिर्झाने टेनिसमधून निवृत्ती घेतल्यानंतर तिला महिला आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मेंटॉर म्हणून जबाबदारी दिली होती.