टीम इंडियाचा रवींद्र जाडेजा आणि बांगलादेशचा शाकिब अल हसनला आशिया चषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे. 27 ऑगस्टपासून यूएईत आशिया चषक स्पर्धा खेळवली जाणार आहे.
श्रीलंकेचा लसिथ मलिंगा आशिया चषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. मलिंगानं 4.7 च्या इकॉनॉमीसह 15 सामन्यात 33 विकेट्स घेतल्या आहेत. पण मलिंगा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालाय. त्यामुळे जाडेजा आणि शाकिबकडे मलिंगाला गाठण्याची संधी आहे.
सध्या खेळणाऱ्या गोलंदाजांमध्ये शाकिब अल हसनच्या खात्यात सर्वाधिक विकेट्स आहे. शाकिबनं आतापर्यंत 18 सामन्यात 24 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
शाकिबनं नुकतीच बांगलादेशच्या नेतृत्वाची धुरा स्वीकारली आहे. आगामी आशिया चषकात मलिंगाचा विक्रम मोडण्यासाठी त्याला अजून 10 विकेट्सची हव्या आहेत
शाकिबपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे रवींद्र जाडेजा. जाडेजानं आशिया चषकात आतापर्यंत 22 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे 12 विकेट्स घेऊन मलिंगाचा विक्रम मोडण्याची संधी जाडेजासमोर आहे.
आशिया चषकात रविवार 28 ऑगस्टला भारताची सलामी पाकिस्तानशी होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरु होईल
दुसरीकडे शाकिब अल हसन आणि कंपनी 30 ऑगस्टला अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानं आशिया चषक मोहिमेला सुरुवात करेल.