लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात पारपडलेल्या आयपीएल 2023 च्या 43 व्या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुल याला मैदानावर फिल्डिंग करताना दुखापत झाली. या दुखापतीनंतर राहुल वेदनेने विव्हळत मैदानाबाहेर पडल्याचे पाहायला मिळाले.
दुखापत झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी के एल राहुल लखनऊचा कॅम्प सोडून मुंबईत पुढील उपचार आणि टेस्ट करण्यासाठी रवाना झाला.
राहुलची दुखापत नेमकी किती गंभीर आहे याबद्दल लखनऊ संघाकडून किंवा बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु राहुलच्या मांडीचे स्नायू ताणले जाऊन दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.
या दुखापतीनंतर केएल राहुलने आयपीएल 2023 मधून माघार घेतली असून आता तो जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलला देखील मुकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
7 ते 11 जून दरम्यान लंडन येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पारपडणार आहे. यात खेळणाऱ्या भारतीय संघामध्ये के एल राहुलची देखील निवड करण्यात आली आहे. परंतु केएल राहुलला आयपीएल सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे तो आयपीएलनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामना ही खेळणे अवघड असल्याचे वृत्त क्रिकबझने दिले आहे.