आयपीएल 2022 ला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरूवात होत आहे. मोसमाचा पहिलाच सामना चार वेळची चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात होणार आहे. या मोसमात दोन्ही टीम नव्या कर्णधारांसह मैदानात उतरणार आहेत. या सामन्यात काही खेळाडूंच्या कामगिरीवर सगळ्यांचंच लक्ष असेल.
स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार असेल, त्याच्याकडून टीमला बऱ्याच अपेक्षा असतील. जडेजा बॉलच नाही तर बॅटनेही आक्रमण करण्यात माहीर आहे. पहिलेही त्याने आक्रमक बॅटिंगने सीएसकेला एकहाती मॅच जिंकवल्या आहेत. जडेजाने आयपीएलमध्ये 200 मॅच खेळल्या यात त्याने 2,386 रन केले आणि 127 विकेटही घेतल्या.
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पुन्हा एकदा कर्णधार म्हणून दिसणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सनी श्रेयसला मोठी रक्कम देऊन विकत घेतलं. याआधी त्याने दिल्ली कॅपिटल्सचंही नेतृत्व केलं. अय्यरने आयपीएलमध्ये 87 मॅच खेळल्या यात त्याने 123.95 च्या स्ट्राईक रेटने 2,375 रन केले, यात 16 अर्धशतकांचा समावेश आहे. अय्यरचा सर्वाधिक स्कोअर 96 रन आहे. मागच्या मोसमात दुखापतीमुळे अय्यरला फक्त 8 मॅचच खेळता आल्या होत्या. मागच्या काही काळापासून अय्यर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. फेब्रुवारी महिन्यात आयसीसीने त्याला फेब्रुवारी महिन्याचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून पुरस्कारही दिला.
आंद्रे रसेलकडे (Andre Russell) एकहाती मॅच फिरवण्याची क्षमता आहे, मग ते बॅटिंग असो किंवा बॉलिंग. याच कारणामुळे केकेआरने त्याला रिटेन केलं होतं. सीएसकेविरुद्धच्या सामन्यात रसेल टीमचा एक्स फॅक्टर ठरू शकतो. रसेलने 84 आयपीएल सामन्यांमध्ये 178 च्या स्ट्राईक रेटने 1700 रन केले, याशिवाय त्याने 72 विकेटही घेतल्या.
सीएसकेने युवा ओपनर ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) 6 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं. मागच्या मोसमात ऋतुराजला सर्वाधिक रन केल्याबद्दल ऑरेंज कॅपही देण्यात आली. गायकवाडचा हा आयपीएलचा चौथा मोसम असेल. 2019 साली त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मागच्या मोसमात त्याने 16 सामन्यांमध्ये एका शतक आणि 4 अर्धशतकांच्या मदतीने 635 रन केले.
व्यंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) केकेआरने 8 कोटी रुपयांना रिटेन केलं. आयपीएलच्या मागच्या मोसमात धमाकेदार कामगिरी केल्यामुळे व्यंकटेश अय्यरची टीम इंडियातही निवड झाली. ऑलराऊंडर असलेल्या अय्यरने वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकात्यामध्ये झालेल्या टी-20 सामन्यामध्ये 2 विकेट घेतल्या आणि नाबाद 35 रन केले. मागच्या मोसमात त्याने 10 सामन्यांमध्ये 370 रन केले आणि 3 विकेटही घेतल्या.