आयपीएलच्या 2021 (IPL 2021) च्या मोसमासाठी सगळ्या 8 टीम त्यांच्या अंतिम खेळाडूंची घोषणा करणार आहेत. या यादीमध्ये काही दिग्गजांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. 11 फेब्रुवारीला आयपीएलच्या या मोसमासाठी मिनी ऑक्शन होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याआधी बीसीसीआयने खेळाडूंची अंतिम यादी द्यायला सांगितली आहे. यात चेन्नईची (CSK) टीम सर्वाधिक खेळाडूंना सोडून देणार असल्याची चर्चा आहे.
चेन्नईच्या टीमचा आधारस्तंभ असलेला सुरेश रैना (Suresh Raina) यावेळी पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार का नाही? याची उत्सुकता कायम आहे. मागच्यावर्षी एमएस धोनीसोबतच रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर आयपीएल खेळण्यासाठी तो युएईला गेला. पण कोरोना आणि बायो-बबलचं कारण देत रैना भारतात परतला. चेन्नईच्या टीमसोबत रैनाचे वाद झाल्याचंही बोललं गेलं. रैनाने 193 आयपीएल मॅचमध्ये 33.34 च्या सरासरीने आणि 137.14 च्या स्ट्राईक रेटने 5,368 रन केल्या. रैनाला सोडून दिलं, तर चेन्नईच्या खिशात आणखी 11 कोटी रुपये येतील.
चेन्नईचा आणखी एक खेळाडू केदार जाधव (Kedar Jadhav) याच्यावर मागच्या आयपीएलवेळी मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. केदारने 8 मॅचमध्ये 93.93 च्या सरासरीने 62 रन केले. केदार जाधवबाबत निर्णय घेताना चेन्नईची टीम धोनीसोबत बोलेल अशी माहिती सूत्रांनी दिली. केदार जाधवला चेन्नईची टीम 7.8 कोटी रुपये देते. आयपीएलच्या 87 मॅचमध्ये केदारने 1141 रन केले आहेत, यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे.
केदार जाधवसोबतच चेन्नईची टीम पियुष चावला, हरभजन सिंग आणि मुरली विजय यांनाही सोडून देईल, असं निश्चित मानलं जात आहे. पियुष चावलाला चेन्नई 6.75 कोटी रुपये तर मुरली विजयला 2 कोटी रुपये देते.
राजस्थानची टीम स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) बाबतही मोठा निर्णय घेऊ शकते. स्मिथला राजस्थानच्या टीमने 12.5 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं, पण याचा राजस्थानला फायदा झाला नाही. मागच्या मोसमात 14 मॅचमध्ये स्मिथने 131.22 च्या स्ट्राईक रेटने फक्त 311 रन केले.
ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) हा आयपीएलच्या मागच्या मोसमातला सगळ्यात अपयशी खेळाडू ठरला. 13 मॅचमध्ये मॅक्सवेलने 15.4 च्या सरासरीने फक्त 108 रन केले. पंजाबच्या टीमने मॅक्सवेललला 10.75 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. मॅक्सवेलसोबतच करुण नायर (5.6 कोटी), शेल्डन कॉट्रेल (8.5 कोटी) आणि कृष्णप्पा गौतम (6.2 कोटी) यांनाही पंजाब डच्चू देऊ शकते.
विराट कोहलीची बंगळुरू ऑलराऊंडर क्रिस मॉरिस (Chris Morris) बाबतही निर्णय घेऊ शकते. मागच्या मोसमात मॉरिसने 9 मॅचमध्ये फक्त 34 रन केले, तर 19.09 च्या सरासरीने 11 विकेट घेतल्या. मॉरिसला आरसीबीने 10 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. मॉरिससोबतच बंगळुरू 5 कोटी रुपयांच्या शिवम दुबे (Shivam Dubey) लाही सोडू शकतं. मागच्यावर्षी शिवम दुबेही बॅट आणि बॉलने अपयशी ठरला होता.