

आयपीएलचा बारावा हंगाम संपण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले असताना, मुंबईनं याआधीच फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान आज दिल्ली आणि चेन्नई यांच्यात क्वालिफायर दोनचा सामना होणार आहे. यात जो संघ सामना जिंकेल तो, मुंबईशी आयपीएलमध्ये भिडणार आहे.


चेन्नईच्या संघाची मदार ही महेंद्रसिंग धोनीवर आहे. या हंगामात धोनीनं 120हून अधिक सरासरीनं धावा केल्या आहेत. धोनी नॉकआऊट सामन्यात आतापर्यंत 17वेळा खेळला आहे. यात त्यानं 456 धावा केल्या आहेत. धोनीची सरासरी 41.45 आहे तर, स्ट्राईक रेट 130हून अधिक आहे.


दिल्ली विरोधात होणाऱ्या क्वालिफायर सामन्यात हरभजनसिंगवर महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. वायझॅकचे मैदान फिरकी गोलंदाजांसाठी लाभदायक असल्यामुळं हरभजसिंगच्या गोलंदाजीकडं विशेष लक्ष असणार आहे. भज्जीनं आतापर्यंत 12 नॉकआऊट सामने खेळले आहे. यात 14 विकेट घेतले आहेत.


एकीकडं चेन्नई संघाकडं धोनी आणि हरभजनसिंग हे दोन हुकुमी एक्के आहेत. तर, दिल्लीकडं एकच खेळाडू असा आहे जो, चेन्नईवर भारी पडू शकतो. हैदराबाद विरोधात झालेल्या सामन्यात ऋषभ पंतनं 21 चेंडूत 49 धावा केल्या होत्या. त्यामुळं या सामन्यातही पंतची बॅट चालली तर दिल्ली सामना जिंकू शकते. यंदाच्या हंगामात पंतनं जबरदस्त खेळी केली आहे. त्यानं 180च्या स्ट्राईक रेटनं 287 धावा केल्या आहेत.