मुंबईकर शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) ऑस्ट्रेलियाचा दौरा गाजवल्यानंतर आता टीम इंडियाला आणखी एक ठाकूर मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मधून रेणुका सिंग ठाकूरने (Renuka Singh Thakur) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच सामन्यात रेणुकाने धमाकेदार कामगिरी केली. रेणुकाने 4 ओव्हरमध्ये फक्त 23 रन दिल्या आणि 1 विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाची विकेट कीपर एलिसा हिलीला रेणुकाने आऊट केलं.
तिने रोहुडूंमध्येच स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळायला सुरुवात केली. यानंतर हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या धर्मशाला अॅकेडमीमध्ये तिची निवड झाली. रेणुका फास्ट बॉलर आहे, तिने एचपीसीएचे प्रशिक्षक पवन सेन यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवले. 2019 साली तिने बीसीसीआयच्या महिला वनडे स्पर्धेत सर्वाधिक 23 विकेट घेतल्या होत्या. त्याच वर्षी तिची भारतीय महिला ए टीममध्ये निवड झाली होती.
रेणुकाच्या आधी हिमाचल प्रदेशच्या दोन महिला खेळाडूंची भारतीय टीममध्ये निवड झाली. शिमल्याच्याच सुन्नीमधली सुषमा वर्मा भारताकडून खेळली, सुषमाने वर्ल्ड कपमध्येही भारताचं प्रतिनिधीत्व केलं. याशिवाय हरलीन देओलचीही हिमाचल रणजी टीममध्ये खेळल्यानंतर टीम इंडियात निवड झाली. हरलीन देओल मुळची चंडीगड मोहालीची आहे.