टी-20मधला हिटमॅन आता कसोटीमध्येही आपली जादू दाखवत आहे. ओपनर म्हणून पहिल्याच सामन्यात रोहित शर्मानं शतकी कामगिरी करत अनेक रेकॉर्ड आपल्या खिशात घातले आहेत.
विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या सामन्यात रोहितनं 154 चेंडूत 6 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीनं शतक झळकावले.
कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करून रोहितनं शतक झळकावताना सर्वात जास्त षटकार लगावले आहेत. याबाबीत रोहितनं शिखर धवन, केएल राहुल आणि विरेंद्र सेहवाग यांना मागे टाकले आहे.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले आहे की, सलामीला पदार्पण करणाऱ्या खेळाडूनं शतकी खेळी करण्यासाठी 4 षटकार लगावले आहे.
याचबरोबर रोहितनं शतक लगावत दिग्गज डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. मायदेशात रोहितनं 98.22च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. याचबरोबर रोहितनं ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
या कसोटी सामन्यात रोहित शर्मा हा तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक करणारा पहिला सलामीवीर ठरला आहे. रोहितनं कसोटी, एकदिवसीय आणि टी-20मध्ये ही कामगिरी केली आहे.
तर, पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावणारा रोहित शर्मा चौथा भारतीय खेळाडू आहे. याआधी शिखर धवन, केएल राहुल, पृथ्वी शॉ यांनी ही कामगिरी केली आहे.
त्याचबरोबर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये शतक करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे.