ICC Cricket World Cup मध्ये भारताला इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर महेंद्रसिंग धोनीवर पुन्हा एकदा माजी क्रिकेटपटूंनी टीका केली आहे. भारतासमोर 338 धावांचं आव्हान होतं. भारताला 5 बाद 306 धावांपर्यंत मजल मारता आली. धोनी 42 धावांवर तर केदार जाधव 12 धावांवर नाबाद राहिले. भारताच्या फलंदाजीवर माजी कर्णधार सौरभ गांगुलीने प्रश्न उपस्थित केले.
पंत आणि पांड्या बाद झाल्यानंतर भारताला पाच षटकांत 71 धावा हव्या होत्या. त्यावेळी धोनी आणि केदार जाधवकडून फटकेबाजीची अपेक्षा केली जात होती. मात्र भारताला 306 धावाच करता आल्या.
शेवटच्या पाच षटकात विकेट हातात असताना सावध खेळण्याचं कारण काय? यावेळी चौकार, षटकार न मारता फक्त एकेरी दुहेरी धावा काढून विजय मिळाला असता का? असा प्रश्न गांगुलीने विचारला आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेननं समालोचन करताना भारताच्या खेळाडूंवर कठोर शब्दांत टीका केली. त्यांनी म्हटलं की, हे काय सुरू आहे. भारताला धावा हव्या असताना सावध खेळ का करत आहेत. भारताकडून विजयासाठी प्रयत्न होत नसल्याचं पाहून प्रेक्षकही निराश होत स्टेडियमधून निघाले.
नासिर हुसेनच्या मतावर सहमती व्यक्त करत भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी म्हटलं की, भारताच्या विजयरथाला फक्त इंग्लंडच रोखू शकत होती. मात्र, शेवटच्या षटकात धोनीचा खेळ हैराण करणारा आहे.
धोनीच्या संथ खेळीवर टीका होत असताना कर्णधार विराट कोहलीने मात्र त्याची पाठराखण केली आहे. शेवटच्या षटकात खेळपट्टी संथ झाली होती. त्यावर खेळणं कठीण होतं. धोनीने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही. इंग्लंडच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला यामुळे धावा होऊ शकल्या नाहीत असं विराट म्हणाला.