भारताविरुद्धचा दुसरा सामना विंडीजनं गमावला असला तरी ख्रिस गेलनं मैदानात उतरताच एका विक्रमाला गवसणी घातली. त्यानंतर फलंदाजी करतानाही त्यानं 9 धावा करताच विंडीजकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
वर्ल्ड कपच्या आधी गेलने सांगितलं होतं की, आपण स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. मात्र, पुन्हा भारताविरुद्धच्या मालिकेत खेळणार असल्याचं तो म्हटला होता. वर्ल्ड कपच्या अखेरच्या सामन्यापासून गेल लाराचा विक्रम मोडण्यासाठी धडपडत होता.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात गेलने विंडीजकडून दोन विक्रम केले. ब्रायन लाराच्या नावावर असलेले दोन विक्रम गेलने आपल्या नावावर केले. विंडीजकडून सर्वाधिक 299 सामने खेळलेल्या लाराने सर्वाधिक 10 हजार 405 धावा केल्या होत्या. भारताविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना हा गेलचा 300 वा सामना होता.
वर्ल्ड कपमधील शेवटच्या सामन्यात 7 धावांवर बाद झालेला गेल वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराच्या विक्रमापासून तेव्हा 11 धावा दूर राहिला होता. त्यानंतर भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याला फक्त 4 धावाच करता आल्या. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्यानं 11 धावा केल्या. आाता गेलच्या 300 सामन्यात 10 हजार 408 धावा झाल्या आहेत. गेल आणि ब्रायन लारा या दोघांनीच वेस्ट इंडिजकडून खेळताना 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
ख्रिस गेलला दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सला मागे टाकण्याची अखेरची संधी आहे. गेल आणि डिव्हिलियर्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये समान 25 शतकं केली आहेत. अखेरच्या सामन्यात त्यानं शतक केलं तर तो डिव्हिलियर्सला मागे टाकू शकतो.