तुळशी आणि आवळा यांची पूजा- प्रत्येक हिंदू घरात तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते. तुळशी ही भगवान विष्णूलाही खूप प्रिय आहे आणि ती माता लक्ष्मीचे रूप मानली जाते. ज्या घरांमध्ये दररोज सकाळ संध्याकाळ तुळशीला दिवा लावून जल अर्पण केले जाते, तेथे भगवान विष्णूसह माता लक्ष्मीची कृपा राहते. याशिवाय आवळा आरोग्यासाठी फायदेशीर आहे, त्याचप्रमाणे एकादशी तिथीला आवळा वृक्षाची पूजा केल्यास भगवान विष्णूचा आशीर्वादही प्राप्त होतो. आवळा नवमीच्या दिवशी आवळा वृक्षाची पूजा करणे विशेष फलदायी असते.
केळीचे झाड- हिंदू धर्मात केळीचे झाड अतिशय पवित्र मानले जाते. हिंदू धर्मात केल्या जाणाऱ्या प्रत्येक पूजा पाठात केळीच्या झाडाची पाने वापरणे शुभ मानले जाते. केळीचे झाड गुरू ग्रह आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित मानले जाते. गुरुवारी केळीच्या मुळामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि पाण्यात चिमूटभर हळद मिसळून केळीच्या मुळाशी अर्पण करणे शुभ असते. असे केल्याने गुरू ग्रह कुंडलीत बलवान बनेल आणि तुम्हाला भगवान विष्णूचा आशीर्वादही प्राप्त होईल. असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते, असे मानले जाते. एखाद्याच्या वैवाहिक जीवनात अडथळे आले तर तेही लवकर दूर होतात.
पिंपळाचे झाड- हिंदू धर्मात पिंपळाचे झाड पवित्र मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडामध्ये 33 कोटी देवता वास करतात. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात, असे मानले जाते, त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं आरोग्याचे वरदान मिळते आणि व्यक्तीच्या जीवनातील अनेक प्रकारची संकटे दूर होतात, असे मानले जाते.
शमी वृक्ष - हिंदू धर्मात शमीच्या झाडाला खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की शमीच्या झाडाची नियमित पूजा केल्यास शत्रूवर विजय प्राप्त होतो. हे झाड खूप शुभ आहे. भगवान रामानेही शमी वृक्षाची पूजा केली. हे झाड श्रीगणेश आणि शनिदेवालाही खूप प्रिय आहे. याशिवाय शमीच्या झाडाची पानेही भगवान शंकराला अर्पण केली जातात.
वटवृक्षाची पूजा- वटवृक्षाला वड किंवा देववृक्ष असेही म्हणतात. वटवृक्षात भगवान भोलेनाथ वास करतात, अशी पौराणिक मान्यता आहे. वटवृक्षाची पूजा केल्यानं अक्षय पुण्य प्राप्त होतं. प्रत्येक महिन्यातील त्रयोदशी तिथीला वटवृक्षाची पूजा करणे शुभ मानले जाते. वटवृक्षाखाली शिवलिंग ठेऊन भगवान शंकराची पूजा केल्याने आशीर्वाद मिळतात, असे मानले जाते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)