आषाढी एकादशीबद्दल विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी सहकुटुंब विठ्ठल मंदिरात दाखल झाले.
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून मंदिराची, मूर्तींची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
सलग दुसऱ्या वर्षी सावळ्या विठुरायाचे मनोहर रूप डोळ्यात साठवून ठेवत त्यांची मनोभावे आराधना करण्याची संधी मिळाल्याबद्दल यावेळी त्यांनी विठुरायाचे आभार मानले.
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या पत्नी लता शिंदे तसेच मानाचे वारकरी दाम्पत्य भाऊसाहेब मोहिनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे यांच्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली.
यंदा राज्यातील युती सरकारला एक वर्षे पूर्ण होत असून गेल्या वर्षभरात अनेक विघ्न अडचणी आल्या मात्र विठुरायाच्या आशीर्वादाने राज्यकारभार सुरळीतपणे करता येणे शक्य झाल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
पंढरपूर मंदिराच्या विकास आराखड्याबाबत सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले.
महापूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मानाच्या वारकऱ्यांच्या सत्कार कार्यक्रम करण्यात आला.
पंढरपूर शहरातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनेसाठी 109 कोटी तर शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी 108 कोटी रुपये मंजूर केल्याचे यावेळी जाहीर केले.