देशाच्या मध्यवर्ती भागात वसलेले नागपूर हे एक प्रमुख शहर असून या शहराला समृद्ध इतिहास, वैभवसंपन्न सांस्कृतिक वारसा आणि निसर्गाचा वरहस्त लाभला आहे. टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आणि संत्रा नागरी अशी नागपूरची ओळख असून दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी येत असतात.
नागपूर शहरापासून 15 किमी अंतरावर कामठी येथील प्रसिध्द ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे बुद्धविहार आहे. बुद्धकालीन इतिहासातील ते महत्त्वाचे आणि पवित्र नाव आहे. येथील अप्रतिम बुद्धमूर्ती जपानतर्फे भेट मिळाली आहे. तिचे वजन 864 किलो असून चंदनाच्या अखंड लाकडापासून ती बनविण्यात आली आहे.
जगभरातील बौद्धधर्मीय आणि लक्षावधी आंबेडकर अनुयायांसाठी नागपुरातील दीक्षाभूमी हे एक पवित्र स्थान आहे. येथील भव्य स्तूप विशेष आकर्षणाचं केंद्र आहे.
महाराष्ट्रातील सर्वात जुने संग्रहालय म्हणून ओळख मध्यवर्ती संग्रहालयाची ओळख आहे. विदर्भाच्या परिघात सापडलेल्या असंख्य पौराणिक आणि ऐतिहासिक वास्तूंचा अमूल्य ठेवा जवळून न्याहाळता येणारे हे मुख्य केंद्र आहे.
टायगर कॅपिटल ऑफ इंडिया अशी ओळख असलेल्या नागपूर शहरापासून अवघ्या 20 किमी अंतरावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आहे. मध्य भारतातील ते एक प्रमुख प्राणी संग्रहालय असून पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.
नागपूर शहरापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेले धापेडवाडा येथे स्वयंभु विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. हे मंदिर विदर्भातली प्रती पंढरपूर म्हणून प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात आषाढी एकादशीला मोठा उत्सव असतो. धापेवाडा गावातील नदीच्या तिरावर शेकडो वर्ष जुनं असं हे विठ्ठल-रुक्मिणी मंदीर आहे.
विदर्भातील रामटेक हे हिंदू धर्मियांचे पवित्र धार्मिक स्थळ मानले जाते. नागपूर शहरापासून 50 किलोमीटर असणाऱ्या रामटेक स्थानाचे पौराणिक, अध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. श्रीराम वनवासात असताना येथे वास्तव्यास होते त्यामुळे रामटेक नाव पडल्याचा लोकमानस आहे.
नागपूर जिल्ह्यातील रामटेकपासून सुमारे सात किमी अंतरावर असलेला नगरधन किल्ला हा ‘भुईकोट’ प्रकारातील एक उत्तम किल्ला आहे. वाकाटककालीन किल्ल्यास मोठा इतिहास आहे. इसवी सनाच्या चौथ्या शतकात ही जागा ‘नंदीवर्धन’ म्हणून ओळखली जात होती.
हिंदू - मुस्लीम धर्मीयांच्या एकीचे प्रतीक असलेले संत ताजुद्दीन बाबांचे पवित्र श्रद्धास्थळ नागपुरातील ताजबाग भागात आहे. भारतासह देश विदेशातून लाखो भाविक भक्त आणि पर्यटक येथे येतात. तसेच नागपुरातील टेकडी गणेश, कोराडी माता मंदिर, बिना संगम, सुराबर्डी शिव मंदिर आदी ठेकाणेही प्रसिद्ध आहेत.