उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागताच अनेकजण बाहेर फिरायला जात असतात. प्रेक्षणीय स्थळांसोबतच धार्मिक पर्यटनाकडेही लोकांचा कल असतो. बीड जिल्ह्यामध्ये देखील पर्यटनाच्या दृष्टीने चांगली ठिकाणे आहेत. या ठिकाणांना आपण भेट देऊ शकता.
पुरातन कंकालेश्वर मंदिर : बीड शहरामधून बिंदुसरा नदी वाहते. याच नदीच्या पूर्व काठावर एका जलकुंडात दिसणारे सुंदर असे हे कंकालेश्वर मंदिर आहे. मागील हजारो वर्षापासून हे मंदिर याठिकाणी इतिहासाची साक्ष देत आहे. जलकुंडात असणारे हे मंदिर नेहमीच पर्यटकांसाठी आकर्षण ठरते
ऐतिहासिक खंडोबा मंदिर: बीड शहराला सांस्कृतिक आणि इतिहास कालीन नगरी म्हणून ओळखले जाते. शहरामध्ये आजही इतिहास कालीन वास्तू आपल्याला दिसून येतात. याच इतिहास कालीन वास्तू पैकी खंडोबा मंदिर आजही दिमाखात उभे आहे. मुघलांचे शूर सरदार सुलतानजी निंबाळकर (हैबतराव) यांनी सन 1722 ते 1751 च्या कालखंडात खंडोबा मंदिर आणि दीपमाळ उभारली, असे इतिहासकार सांगतात.
सत्तर फुटी दीपमाळ: बीड येथील खंडोबा मंदिराच्या समोरील बाजूस भव्य अशी सत्तर फुटी दीपमाळ आहे. ही दीपमाळ महाराष्ट्रात सर्वात उंच असल्याचे जाणकार सांगतात. वीट आणि चुन्याचा वापर करुन ही भव्य दीपमाळ उभारण्यात आली होती. जवळपास 300 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली ही दीपमाळ आजही तटस्थपणे इतिहासाची साक्ष देत उभी आहे.
खजाना विहीर: बीड शहरापासून 5 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर धुळे-सोलापूर राज्य महामार्गाच्या लगत खजाना विहीर आहे. साडेतीनशे वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून या परिसरातील शेतकऱ्यांची जमीन ओलिताखाली आणायचं काम ही खजाना विहीर करते. बीड शहराजवळच इ.स. 1572 च्या काळात विहीर बांधली गेलेली असावी असे इतिहासकार सांगतात. विहीरी जमिनीपासून 23 फूट खोल आहे.
योगेश्वरी मंदिर: मराठवाड्यातील सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे हे शहर परळी वैजनाथपासून अंबेजोगाई हे ठिकाण अवघ्या 35 कि. मी. अंतरावर आहे. अंबेजोगाई येथील योगेश्वरी देवीचे भव्य मंदिर पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. या मंदिराची रचना हेमाडपंती स्थापत्यशैलीची असून मंदिर उत्तराभिमुख आहे. देवळास चहू दिशेस महाद्वार आहेत.
वैद्यनाथाचे मंदिर: बीड शहरापासून अवघ्या 90 किलोमीटर अंतरावर वैद्यनाथ मंदिर आहे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे एक मानले जाते. हे मंदिर देवगिरीच्या कालखंडात श्रीकृष्णपाद हेमादित्यने बांधले होते, असे सांगितले जाते. पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली.