बीड जिल्ह्यात धार्मिक महत्त्व असणारी अनेक मंदिरे आणि पुरातन वास्तू आहेत. शेकडो वर्षांपासून ती इतिहासाची साक्ष देत आहेत. काळाच्या ओघांमध्ये काही मंदिराची पडझड होताना दिसतेय.
आता हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील पुरातन वास्तूंची पाहणी करून त्याचे संवर्धन करण्यात येणार आहे.
माजलगावपासून जवळच केसापुरी येथे पुरातन मंदिर आहे. स्थापत्य कलेचा उत्कृष्ठ ठेवा असलेलं हे मंदिर चालुक्य काळात बांधल्याचं सांगतिलं जातं. या मंदिराची काही प्रमाणात पडझड झाली असून त्याच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली होती.
केसापुरी ग्रामस्थांनी मंदिर संवर्धनाबाबत सातत्याने मागणी केली होती. आता पुरातत्व विभागाने या मंदिराची पाहणी केली असून संवर्धनाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांत केसापुरी मंदिराला गतवैभव प्राप्त होणार आहे.
पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे व सेवानिवृत्त असलेले जतन समितीचे बालाजी बनसोडे यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली. वास्तुशिल्पाचे पुनर्निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न केले. आता या कामात ग्रामस्थांचाही सहभाग असणार आहे.
पुरातत्व विभागाने वास्तू शिल्पांची पाहणी करून आराखडा तयार केला आहे. ड्रोन कॅमेराद्वारे छायांकन करून त्यात आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत.
मंदिराच्या जतन व संवर्धनासाठी अंदाजे तीन कोटी खर्चाची तरतूद आवश्यक आहे. पुढील पिढीला मंदिराचा इतिहास माहिती व्हावा यासाठी हे संवर्धन गरेजेचे आहे, असे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे यांनी सांगितले.