महाराष्ट्रात अनेक पुरातन मंदिरे आणि वास्तू आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेकजण फिरण्यासाठी अशा ठिकाणी आवर्जून जात असतात. उपराजधानी नागपूरपासून केवळ 75 किमी तर भंडारापासून अवघ्या 20 किमी अंतरावर अंभोरा हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.
पाच नद्यांचा संगमावर वसलेले हे निसर्गरम्य ठिकाण नागपूरसह विदर्भात प्रसिद्ध आहे. कुही तालुक्यातील अंभोरा या ठिकाणी वैनगंगा, कन्हान, आम, मुरझा आणि कोलारी या पाच नद्यांच्या संगम आहे. त्यामुळे या ठिकाणाला भौगोलिक समृद्धीसह अध्यात्मिक दृष्टीने देखील महत्त्व प्राप्त झाले आहे.
नागपूर आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्याची सीमारेषा वैनगंगा नदीमुळे निर्माण झाली आहे. आंब (अम्भ) म्हणजे पाणी आणि पाण्याने भरलेले जलप्रदेश म्हणजे अंभोरा होय. अंभोरा मुख्यतः त्याच्या जलसमृध्दीसाठीच प्रसिद्ध आहे.
अंभोरा येथील टेकडीवर प्रभू शिवाचे मंदिर आहे. चैतन्येश्वराच्या चैतन्यमयी वातावरणात इथे दर्शन घेऊन दूरवरचा नयनरम्य परिसर न्याहाळता, अनुभवता येतो. निसर्गाचे अमीट रूप काय असतं याची प्रचिती अंभोरा येथे अनुभवता येते.
अंभोरा येथे पाय ठेवताच उजवीकडे वैनगंगेचे विस्तीर्ण पात्र दिसते. वैणगंगेच्या धरणाच्या बॅक वॉटरचे विशाल पात्र व परिसरातील जलसमृध्द आल्हाददायी आहे. नुकतेच या परिसरात वैनगंगा नदीवर पर्यटकांना आकर्षित करेल असा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समृध्द 'स्टेट ऑफ आर्ट' पूल उभारण्यात आला आहे.
या पुलावर व्ह्यूईंग गॅलरीची निर्मिती केली आहे. पुलाची लांबी 705.20 मीटर असून 15.26 मीटर रुंदी आहे. वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग यासोबतच परिसरातील पर्यटकांसाठी एक विशेष पर्यटनस्थळ म्हणूनही पुलाचा विकास करण्यात येत आहे.
या पुलाच्या परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दोन बाजूंचे फुटपाथ पॅनोरॅमिक लिफ्ट आणि जिने आहेत. या पुलावरून चैतन्येश्वर मंदिर परिसरासह आसपासच्या क्षेत्रातील उत्कृष्ट दृष्ये पर्यटकांना पाहता येणार आहेत.
रामायणात राम-लक्ष्मण व सीतेने याच नदी तीराने परतीचा प्रवास केला होता. तर महाभारतातील पाडंवांनी वनवासातील काही काळ या परिसरात घालविल्याचा एक लोकसमज आहे.
अंभोरा परिसरात राहण्यासाठी धर्मशाळा व एमटीडीसीचे यात्री निवास आहे. या स्थानी निवास व पारंपरिक भाजी-भाकरीची उत्तम सोय आहे. यातून ग्रामस्थांनी रोजगार मिळविला आहे. गोसेखुर्द धरणाने प्रभावित झाल्यानंतर रोजीरोटीचे साधन म्हणून मासेमारी स्वीकारली आहे. बांधकाम विभाग, पर्यटन विभाग यासह मंदिराच्या धर्मशाळा व यात्री निवास येथे आहेत