श्रीरामांचं सिंहासन आणि त्यांचं द्वार सोन्याचं असावं, अशी भाविकांची इच्छा असल्याने श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
राम मंदिर उभारणीसाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे निधी समर्पण मोहीम राबवण्यात आली होती. ज्याद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी निधी दिला होता.
शिवाय अनेकांनी धातू दानही केलं होतं. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सध्या सोने-चांदी सुरक्षित लॉकरमध्ये ठेवले आहे.
राम भक्तांनी अर्पण केलेल्या या मौल्यवान धातूंचा वापर भगवान श्रीरामांच्या गाभाऱ्याच्या मुख्य दरवाजाच्या उभारणीत केला जाणार आहे.
मंदिराच्या तळमजल्याचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलं असून यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ते पूर्ण होऊ शकतं, असा अंदाज आहे. या तळमजल्यात सागवानाचे 40 दरवाजे, खिडक्या असणार आहेत.
दरम्यान, मंदिराची भव्यता आणि दिव्यता एवढी सुंदर असावी की, ते पाहिल्यावर नुसतं पाहतच राहावंसं वाटायला हवं, अशीही भाविकांची मागणी आहे.
म्हणूनच देवाचा दरवाजा सोन्याने मढवण्याचा ट्रस्टचा विचार आहे. भक्तांनी राम मंदिर उभारणीसाठी 4 ते 5 किलो सोनं अर्पण केलं आहे.