काशीमध्ये अशी श्रद्धा आहे की, रंगभरी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी बाबा विश्वनाथांनी येथील स्मशानभूमी असलेल्या मणिकर्णिका घाटावर आपल्या गणांसह होळी खेळली. अघोरी, तांत्रिक आणि साधू संत डमरू आणि शंखांच्या आवाजात जळत्या चितेमध्ये एकमेकांना राख लावतात.
असे मानले जाते की बाबा विश्वनाथ स्वत: अदृश्यपणे या अद्भुत होळी खेळण्यासाठी आणि त्याच्या छटा पाहण्यासाठी सहभागी होतात. बनारसच्या जगप्रसिद्ध मणिकर्णिका घाटावर अशी होळी खेळण्याची परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे.
होळी खेळायला सुरुवात होण्यापूर्वी बाबा मसननाथांची सजावट, पूजा आणि त्यांची आरती केली जाते. यानंतर राख आणि गुलालाची होळी खेळली जाते.
यंदा बनारसमध्ये मसनाच्या होळीला अघोर पीठ बाबा कीनाराम आश्रमापासून मिरवणुकीने सुरुवात झाली. या मिरवणुकीत हजारो लोक सहभागी झाले होते.
मिरवणुकीत अनेक शिवभक्त त्यांच्या वेशात सहभागी झाले होते. सुमारे 5 किलोमीटर चाललेला हा प्रवास सोनारपुरा आणि भेलूपुरा मार्गे जाऊन राजा हरिश्चंद्र घाटावर संपला.
हिंदू पौराणिक कथेनुसार, भगवान शिवाने महाशिवरात्रीला देवी पार्वतीशी विवाह केला आणि काही दिवस पार्वतीच्या मातृगृहात राहिले. असे मानले जाते की दोन आठवड्यांनंतर, रंगभरी एकादशीला, भगवान शिवाने तिला लग्नानंतर पहिल्यांदा काशीला आणले.
काशी विश्वनाथ मंदिरात देवी पार्वतीचे आगमन शिवभक्तांनी साजरे केले, असे मानले जाते. मात्र शिवभक्तांना रंग खेळण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे होळी खेळण्यासाठी भगवान स्वतः स्मशानभूमीत गेले. त्यांच्याबरोबर भस्माने होळी खेळले.