नाशिक, 28 सप्टेंबर : मंदिरांची नगरी अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये भव्य बीपीएस स्वामी नारायण मंदिरातील मुर्तीप्रतिष्ठा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.
मंदिराचे भूमिपूजन कार्यक्रम वेळी देखील मी आलो होतो. पण आज लोकार्पण सोहळ्यात मी मुख्यमंत्री म्हणून आलो हे स्वामीनारायण यांचा आशीर्वाद आहे, अशी भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
'गोदावरी नदीच्या काठावर नाशिक शहर वसलं आहे. कुंभ नगरी अशीही नाशिकची ओळख आहे. स्वामी नारायण मंदिर नाशिक शहराची शोभा वाढवेल,' अशी भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
नाशिकच्या तपोवन परिसरात भव्य बीपीएस स्वामी नारायण मंदिर साकारण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांपासून या मंदिराचे काम सुरू होते. या मंदिराचे भव्य बांधकाम तसंच खांबांवरी सुबक नक्षीकाम पाहून मुख्यमंत्री भारावून गेले होते.
तपोवन केवडीबन येथे उभारण्यात आलेल महाकाय स्वामी नारायण मंदिर बघण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी भक्तांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमालाही भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त ब्रम्हस्वरूप महंत स्वामींचे आगमन नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वीच झाले. अनेक साधू महंत देखील यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंदिर परिसरासह शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
मूर्ती प्राणप्रतिष्ठावेळी नाशिककरांसह गुजरात मुंबई पुणे खानदेशसह देश विदेशातून लाखो हरी भक्तांची उपस्थिती होती.मंदिराची नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहरात आता स्वामी नारायण मंदिराची भर पडल्याने भक्तगण आनंदी झाले आहेत.