मुस्लीम देश असलेल्या संयुक्त अरम अमिरात म्हणजेच युएईची राजधानी असलेल्या अबू धाबीमध्ये पहिलं हिंदू मंदिर बांधलं जात आहे. या मंदिराची पाहणी करण्यासाठी भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर गेले होते. जयशंकर यांनी याचे काही फोटो शेअर केले आहेत. जयशंकर यांनी मंदिर निर्माण करत असलेली संस्था BAPS ची टीम आणि तिकडे काम करणाऱ्या कामगारांची भेट घेतली आणि त्यांच्याशी बातचित केली.
एस. जयशंकर तीन दिवसांच्या युएई दौऱ्यावर आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी BAPS हिंदू मंदिराचं दर्शन करण्याचं सौभाग्य मिळालं. मंदिर निर्माणाचं कार्य जोरात सुरू असल्याचं पाहून आनंद झाला, असं ट्वीट जयशंकर यांनी केलं आहे.
युएईमध्ये असलेल्या भारतीय दुतावासांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं जयशंकर यांनी मंदिर उभारणीमध्ये सहयोग करत एक वीटही ठेवली.
हिंदू मंदिराचं बांधकाम 55 हजार स्क्वेअर मीटरच्या जमिनीवर होत आहे. फक्त अबू धाबीच नाही तर मध्य पूर्व देशांमध्ये हे पहिलं पारंपरिक हिंदू मंदिर आहे.
हिंदू मंदिरामध्ये मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे, पण मंदिरातल्या काही भागांचं बांधकाम अजून शिल्लक आहे. हे बांधकाम लवकरच पूर्ण होणार आहे. 2024 पर्यंत जनतेसाठी हे मंदिर खुलं होईल, असा अंदाज वर्तवला जातोय, पण याबद्दल अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.