देशातील शाळांमध्ये भौतिक सुविधा वाढत आहेत. विशेषत: अत्याधुनिक तंत्रज्ञान असणाऱ्या इंग्लिश स्कूल आता शहरातच नाही तर गाव-खेड्यांतही विद्यार्थी आणि पालकांचे आकर्षण ठरत आहेत.
राज्यातील जिल्हा परिषद शाळांचीही प्रयोगशिलता आणि नवोपक्रमासाठी नेहमीच चर्चा असते. पुणे जिल्ह्यात अशीच एक उपक्रमशिल शाळा असून ती देशातील पहिली झिरो एनर्जी स्कूल ठरली आहे.
एका आदर्श शिक्षकाने शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेचा कायापालट केला आहे. मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्या उपक्रमशिलतेचे देशभर कौतुक होत आहे.
शाळेला नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अत्याधुनिक रुप दिलं असून जिल्हा परिषदेची शाळा एखाद्या इंटरनॅशनल स्कूलपेक्षाही भारी दिसत आहे.
वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना संगणक तर होते. मात्र सततच्या विजेच्या भार नियमावर मात करण्यासाठी पालक आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेत 430 किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
सौर ऊर्जेद्वारे वीज वापरणारी पुणे जिल्ह्यातील ही पहिली शाळा आहे. विशेष म्हणजे शाळेची विजेची गरज भागवून गावातील पथदिव्यांसाठी देखील वीज दिली जाते.
जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता खालावत असल्याची चर्चा अनेकदा होत असते. मात्र वाबळेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मागील चार वर्षांपासून टॅब वर शिक्षण दिले जाते.
गुणवत्ते बरोबरच सामाजिक जाणीव म्हणून शाळेच्या परिसरात 73 प्रकारची झाडे देखील लावण्यात आली आहेत. यात पाणी बचतीसाठी सर्व झाडांना ठिबक सिंचन देखील करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, भूगोल आणि शेतीचेही धडे दिले जातात. शाळेच्या आवारातच गांडूळ खत प्रकल्प राबविण्यात येत आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना संगीत, कला, क्रीडा, विज्ञान आदीसंबंधी शिक्षण दिले जाते. विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना शिकवले जाते.