पुण्यातील श्री कसबा गणपती हा मानाचा पहिला गणपती आहे. कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळा एवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे. अशी आख्यायिका आहे. आज मोठ्या उत्साहात त्याला निरोप देण्यात आला. (फोटो क्रे़डिट : अमेय खरे, अंजली गुडेकर, झी मराठी)
श्री तांबडी जोगेश्वरी गणपती हा मानाचा दुसरा गणपती आहे. श्री तांबडी जागेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता. म्हणूनच तांबडी जोगेश्वरी गणपतीला मानाचं दुसरं स्थान प्राप्त झाले आहे. कसबा गणपतीप्रमाणं या गणेशोत्सवालाही 1893 पासून प्रारंभ झाला. बुधवार पेठेतल्या या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. पितळी देवाऱ्हात या गणपतीची स्थापना केली जाते. आणि इथंच चार युगातील बाप्पाची रुपं पाहायला मिळतात. मोठ्या भक्तीभावाने यावेळी बाप्पाला निरोप देण्यात आला.
श्री गुरुजी तालीम गणपती हा पुण्यातील मानाचा तिसरा गणपती आहे. लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला. गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा पुण्याचा मानाचा तिसरा गणपती. प्रारंभी हा गणपती तालमीमध्ये बसवला जायचा. सध्या मात्र तालीम अस्तित्वात नाही. या गणेशोत्सवाला 1887 मधेच सुरुवात झाली. भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवीले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाचा पाया रचला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो.
श्री तुळशीबाग गणपती हा पुण्यातील मानाचा चौथा गणपती आहे. तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती हा उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. दक्षित तुळशीबागवाले यांनी 1900 साली या गणेशोत्सवाची उत्सव सुरुवात केली. तुळशीबाग गणेश मंडळाची मूर्ती फायबरची आहे. ज्येष्ठ मूर्तीकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करतात. याठिकाणीही आज यावेळी बाप्पाला मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला.