पुणे, 23 एप्रिल : कोरोनाने राज्यात हाहाकार माजवला आहे. अनेकांची कुटुंबच्या कुटुंब उद्धवस्त झाली आहे. अशातच पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे महानगरपालिका हडपसर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत असलेले श्यामसुंदर लक्ष्मण कुचेकर यांच्या कुटुंबातील 4 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
पुणे मनपा आरोग्य सेवेत कार्यरत असताना कोरोना काळातही न डगमगता ते आपली जबाबदारी पार पाडत होते. मात्र त्यांच्या अख्ख्या कुटुंबाला कोरोनाने विळखा घातला. वडील लक्ष्मण कुचेकर, आई सुमन कुचेकर, भाऊ विजय कुचेकर, अश्विनी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
एकाच कुटुंबातील ४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या पाहून लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. अशात अख्खं कुटुंबच्या कुटुंबाचा मृत्यू होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.