जगभरात कोरोनाव्हायरसमुळे 7 लाखांपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत तर 80 लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. त्यामुळे कोरोनाची लस कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगभरात सध्या 165 कोरोना लशींवर काम सुरू आहे. त्यापैकी 26 लशींचं क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. तर सहा लशी क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत.
तिसऱ्या टप्प्यात व्यापक स्तरावर ट्रायल केलं जातं. मोठ्या संख्येनं लोक या ट्रायलमध्ये सहभागी होतात. लशीचा परिणाम किती आहे आणि किती लोकांवर ती काम करत आहे, याची माहिती या टप्प्यात मिळते.
सहापैकी तीन लशी या चीनच्या आहेत. सिनोवॅक, वुहान इन्स्टिट्युट ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्ट आणि सिनोफॅरम/बीजिंग इन्स्टिट्युट ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्ट.
अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीच्या कोरोना लशीच्या पहिल्या दोन टप्प्याचे परिणाम चांगले आले आहेत. 27 जुलैपासून तिसरा टप्पा सुरू झाला आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीकडे सर्वांचे डोळे लागून आहेत. या लशीचे वेगवेगळ्या देशात क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. भारतातील सीरम इन्स्टिट्युटही या लशीसंदर्भात भागीदार आहे.
भारताच्या भारत बायोटेक आणि जायडस कॅडिला या कंपनीच्या कोरोना लशीचं ह्युमन ट्रायल सुरू झालेलं आहे. भारत बायोटेकने याआधी पोलिओ, रेबीज, चिकनगुनिया, जापानी इनसेफ्लाइटिस, रोटा व्हायरस आणि झिका व्हायरसवरील लसही तयार केली आहे.
जगभरातील या सहा लशी क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्या असतील तर त्या यशस्वी ठरतील याची शाश्वती देता येत नाही, असंही WHO ने स्पष्ट केलं आहे.