पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील बटाटा पिकाचे आगार असलेल्या सातगाव पठार भागात मागील 8 दिवस सातत्याने वळवाचा मुसळधार पाऊस होत असून जमिनीत गाळ आणि ओलसरपणा वाढून बटाटा शेतातच सडू लागला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बटाटे काढायला सुरूवात केली आहे. मात्र, शेतामध्ये ओलसरपणा वाढल्याने ट्रॅक्टर किंवा बैल जोडीने बटाटे काढता येत नाही. यामुळे मजुरांकडून लाकडी काठीने बटाटे काढावे लागत आहेत त्यामुळे बटाटा काढणी खर्चात मोठी वाढ झाली आहे.
शेतात गाळ झाल्याने बटाटा काढणी बैलजोडी किंवा ट्रॅक्टरने काढणी करता येत नाही. त्यामुळे काढणी खर्चात वाढ झाली आहे. पुरुष मजुरास 250 किंवा 300 रुपये व महिला मजुरास 200 किंवा 250 रुपये व जोडीला 500 किंवा 600 ते 700 रुपयांपर्यंत मजुरी द्यावी लागते.असे एकावेळी मोठ्या शेतकऱ्यांकडे 25 ते 30 मजूर बटाटे काढणीस लागत आहेत.