इंदौर: एका स्वयंसेवी संस्थेने इंदौर येथील किला मैदानात भिकारीमुक्त शहर मोहिमेअंतर्गत शिबिराचं आयोजन केलं होतं. संस्थेच्या काही स्वयंसेवकांनी शहरातील भिकाऱ्यांना या शिबिरात आणलं होतं. यामध्ये कालका मंदिरासमोर भीक मागणाऱ्या एका भिकाऱ्यालाही याठिकाणी आणण्यात आलं होतं. येथे आणल्यानंतर संस्थेच्या स्वयंसेवकांनी संबंधित वृद्ध व्यक्तीची विचारपूस केली, तेंव्हा त्यांना धक्काच बसला आहे. संबंधित व्यक्तीने दिलेल्या पत्त्यावर जावून कार्यकर्त्यांनी पाहणी केली आहे.
कालका मंदिरासमोर बसणाऱ्या या वयोवृद्धाचं घर पाहून स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्तेही चक्रावले आहेत. कारण हा भिकारी एका अलिशान बंगल्यात राहत होता. या बंगल्यात सर्व सोयी सुविधा उपलब्ध होत्या. या बंगल्यात काही लोकंही राहत होते. त्यांच्याकडून एनजीओच्या स्वयंसेवकांना संबंधित वृद्ध व्यक्तीचं नाव रमेश असल्याची माहितीही मिळाली.
संभाषणा दरम्यान समजलं की, रमेशचा मोठा व्यवसाय होता. त्यांनी लग्नही केलं नव्हत. ते आपला भाऊ, पुतण्या आणि इतर याच घरात राहत असत. पण रमेशला दारुचं भयानक व्यसन लागलं. रमेश यांची दारूपासून सुटका करण्यासाठी कुटुंबाने सर्व प्रयत्न केले, परंतु रमेशच्या वागण्यात काहीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे कुटुंबीयही त्यांना कंटाळले. त्यानंतर रमेशची परिस्थिती खालावत गेली. पुढे जावून रमेश व्यसनाच्या एवढे आहारी गेले की, त्यांनी भिकाऱ्यांप्रमाणे रस्त्यावर भटकायला सुरुवात केली.