कोरोनाशी लढाईत भारताचे नाही तर परदेशी खेळाडू आघाडीवर, कोट्यवधींची कमाई कऱणाऱ्यांनी केली इतकी मदत जगात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. अनेक देशांमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. लोकांना मदत कऱण्यासाठी सेलिब्रेटी, दिग्गज खेळाडू सरसावले आहेत. मात्र यात परदेशी लोकांच्या तुलनेत भारतीय खेळाडू मात्र मागे असल्याचं चित्र आहे.
स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने त्यांच्या देशात कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहेत. फेडररची वार्षिक कमाई जवळपास 7.2 अब्ज रुपये इतकी आहे. त्यानं कोरोना ग्रस्तांसाठी 7 कोटी रुपयांची मदत केली आहे.
पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोची वार्षिक कमाई जवळपास 34 अब्ज 60 कोटी इतकी आहे. त्यानं आतापर्यंत कोरोना व्हायरसला बळी पडलेल्यांसाठी 8.28 कोटी रुपये दान केले आहेत. त्याच्या मालकीच्या हॉटेलचं त्यानं हॉस्पिटलमध्ये रुपांतर करण्यासही परवानगी दिली आहे. तिथल्या डॉक्टर आणि नर्सचा खर्चही त्यानं उचलला आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डोप्रमाणं फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीसुद्धा मदत करण्यात मागे नाही. वर्षाला 30 अब्ज रुपयांची कमाई करणाऱ्या मेस्सीने 8 कोटी रुपयांची मदत केली आहे. त्याची ही मदत बार्सिलोनाच्या रुग्णालयासाठी दिली जाईल. याठिकाणी कोरोनाग्रस्तांवर उपचार आणि संशोधन केलं जात आहे.
पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रीदीनेसुद्धा कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. वर्षाला 2 अब्ज रुपये कमावणाऱ्या आफ्रिदीने त्याच्या एका फाउंडेशनमार्फत कोरोनाग्रस्तांना खाद्यपदार्थ, स्वच्छतेसाठी साबण, सॅनिटायझर या अत्यावश्यक वस्तू पोहोचवल्या आहेत.
क्रिकेटचा देव असं समजलं जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची वार्षिक कमाई 9 अब्ज रुपये इतकी आहे. कोरोनाग्रस्तांसाठी सचिन उशिराच पुढे आला. त्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 25 लाख रुपये आणि पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी 25 लाख रुपये दिले आहेत.
बीसीसीआयचा अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुलीनेही कोरोनाच्या लढ्यासाठी मदतीचा हात दिला आहे. त्यानं 50 लाख रुपयांचे तांदूळ कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबियांसाठी दिले आहेत. गांगुलीची वार्षिक कमाई 4 अब्ज रुपये इतकी आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीनेसुद्धा मदत केली आहे. मात्र त्याच्या या मदतीवरून त्याच्यावर टीका केली जात आहे. वर्षाला 8.35 अब्ज रुपयांची कमाई करणाऱ्या धोनीने कोरोनाग्रस्तांसाठी 1 लाख रुपयांची मदत केली.
सध्या सर्वाधिक टीकेचा धनी झाला तो भारताचा कर्णधार विराट कोहली. वर्षाला 9 अब्ज रुपये मिळवणाऱ्या विराटने अद्याप तरी कोणतीच मदत दिलेली नाही. त्यानं सोशल मीडियावरून लोकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र त्यानं जाहीर न करता मदत केल्याचंही म्हटलं जात आहे.
भारताची माजी क्रिकेटपटू लक्ष्मीरतन शुक्ला, कुस्तीपटू बजरंग पुनिया, हिमा दास, पीव्ही सिंधू, इरफान पठाण, युसुफ पठाण यांनीही त्यांच्या राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांना मदत केली आहे.
बांगलादेशच्या क्रिकेट संघाने मिळून 28 लाख रुपयांची मदत केली आहे. तर लंकेच्या क्रिकेट बोर्डाने एक कोटींचे दान केले आहे. पाकिस्तानचे पंच आलीम डार हेसुद्धा कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धावून आले आहेत. त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये अशा लोकांसाठी मोफत जेवणाची सोय त्यांनी केली आहे.