सुरक्षित पैसे कुठे राहातील तर FD मध्ये अशी भारतीयांची आजही धारणा आहे. त्यामुळे आपल्या कमाईतील काही रक्कम ही FD मध्ये ठेवली जाते.
गेल्या वर्षभरात व्याजदरात सातत्याने वाढ होत असल्याने बँकांनीही एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. देशातील सर्वात मोठ्या सरकारी आणि खाजगी बँका अधिक व्याज देणाऱ्या त्यांच्या स्वतःच्या विशेष योजना बंद करणार आहेत.
तुम्ही अजूनही पैसे गुंतवले नसतील तर तुमच्याकडे ही शेवटची संधी आहे. 31 मार्चआधी तुम्ही पैसे गुंतवा. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँक त्यांच्या दोन विशेष मुदत ठेव योजना बंद करणार आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियाने 15 फेब्रुवारी 2023 रोजी 'अमृत कलश' नावाने 400 दिवसांच्या कालावधीसाठी विशेष FD लाँच केली होती. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के तर सर्वसामान्य ग्राहकांना ७.१० टक्के व्याज दिलं जात आहे.
समजा तुम्ही SBI च्या या विशेष योजनेअंतर्गत 1 लाख रुपयांची FD केली तर 400 दिवस पूर्ण झाल्यावर तुम्हाला सामान्य गुंतवणूकदारांसाठी एकूण 8,017 रुपये व्याज मिळेल, तर ज्येष्ठ नागरिकांना 8,600 रुपये व्याज मिळेल.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत जाऊन तुम्ही एफडीसाठी अर्ज करू शकता. याशिवाय घरी बसून SBI YONO अॅपद्वारेही गुंतवणूक करता येईल.
देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या HDFC बँकेच्या 'सिनियर सिटीझन केअर एफडी'वर ७.७५ टक्के व्याज मिळत आहे. या विशेष मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख देखील ३१ मार्च २०२३ आहे.
गेल्या एका वर्षात भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात सातत्याने वाढ केल्यामुळे बँकांनीही एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. अनेक बँका आणि NBFC FD वर जास्त व्याज देत आहेत.