

प्रसिद्ध स्टंट दिग्दर्शक आणि अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचं प्रदीर्घ आजाराने २७ मे रोजी निधन झालं. वीरू यांच्या निधनाची दुःखद बातमी कळताच अनेक बॉलिवूड कलाकार मंडळी अजय आणि काजोलच्या घरी त्यांचं सांत्वन करण्यासाठी गेले. शाहरुख खानपासून राकेश रोशनपर्यंत आणि अमिताभ बच्चनपासून राणी मुखर्जीपर्यंत अनेकजण अजयच्या घरी गेले.


काजोल त्यांच्या सासऱ्यांच्या फार जवळ होती. त्यामुळे ती त्यांच्या जाण्याचं दुःख सहन करू शकली नाही. स्वतः ऐश्वर्या आणि अभिषेक तिचं सांत्वन करत होते. एकीकडे अजय आणि काजोलने त्यांच्या आयुष्यातील सर्वात जवळची व्यक्ती गमावली होती. तर दुसरीकडे अमिताभ बच्चन यांनाही त्यांचा मित्र गमावल्याचं दुःख होतं.


वीरू यांच्या निधनाबद्दल कळताच अमिताभ यांनी आपल्या सिनेमाचं चित्रीकरण अर्धवट सोडलं आणि ते अंत्यसंस्काराला पोहोचले. त्यांनी वीरू यांच्यावर फार भावनिक पोस्टही लिहिली. जळत्या चितेसमोर बसणं... अस्थी घेऊन जाण्याची वाट पाहणं... आपल्या जवळच्या व्यक्तीला लांब जाताना पाहणं... बाबा, आई.. पुन्हा एका नवीन दिवसाची सुरुवात आणि नवीन काम.


अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये वीरू यांच्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. अमिताभ यांनी लिहिलं की, ‘मी पहिल्यांदा त्यांना राजस्थानमधील पोशीना गावात भेटलो होतो. रेशमा और शेरा सिनेमाच्या चित्रीकरणावेळी आम्ही भेटलेलो. जेव्हा तेव्हा ते डमीसोबत अक्शन सीनची तालिम करत होते.’


‘मला आजही स्पष्ट आठवतं की, राजस्थानच्या त्या उन्हात डमीसोबत अक्शनची तालीम करताना ते किती मेहनत घेत होते. त्यांना किती दुखत होतं याची आम्हा सर्वांनाच कल्पना होती. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते दुखणं मला आजही आठवतं. पण कितीही दुखलं तरी ते डमीसोबत सराव करतच होते.’


पुढे अमिताभ यांनी लिहिलं की, ‘आणि एक दिवस आम्ही त्यांना गमावलं.. वीरू देवगण फार चांगले अक्शन दिग्दर्शक होते. त्यांनी स्टंटमध्ये नेहमीच नाविण्य आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्टंटमॅनसाठी नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या. सध्या सिनेसृष्टीत असे अनेक स्टंटमॅन आहेत जे स्वतः निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. वीरू देवगण यांच्यामुळे हे शक्य झालं.’


वीरू देवगण यांचं सर्वोत्तम टॅलेंट म्हणजे अजय देवगण. आम्ही अनेक सिनेमांत एकत्र काम केलं. माझ्या अनेक सिनेमांसाठी वीरू यांनी अक्शन सीन केले आहेत. वीरू पंजाबचे असल्यामुळे ते सेटवर माझं स्वागत अमिताभ सिंघया या नावानेच करायचे.


अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले की, ‘वीरू यांचा मृत्यू माझ्यासाठी एक धक्का आहे. जेव्हा मला त्यांच्या निधनाची बातमी कळली तेव्हा मी चेहरे सिनेमाच्या चित्रीकरणात होतो. मी काम थांबवलं आणि संपूर्ण टीमसोबत दोन मिनिटांची श्रद्धांजली दिली.’