कामाव्यतिरिक्त उरलेल्या वेळेत त्या माता आणि मुलांना विविध आजारांबाबत जागरूक करतात. कुटुंब नियोजन, संसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती करण्याचं काम त्यांनी एकट्याने सुरू ठेवलं आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामाची पावती म्हणून त्यांची 2009 आणि 2020मध्ये दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातल्या सर्वोत्कृष्ट आरोग्य कर्मचारी म्हणून आणि 2021मध्ये राज्यातल्या सर्वोत्कृष्ट आरोग्य कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली.
आता त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते देशातल्या सर्वोत्तम कर्मचारी म्हणून पुरस्कार मिळाला आहे. रोजच्या जीवनात कठीण प्रसंगांना तोंड देऊनही त्यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिलं. कार्यक्षेत्रातल्या 12 गावांमधल्या नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेतले. 1999मध्ये वडिलांचं निधन झालं असतानाही त्या कामावर उपस्थित होत्या. काम संपल्यानंतर त्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिल्या.
रिटा देवींनी सांगितलं, की `मी माझ्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगातून गेले. लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणं हेच मला आयुष्यभर करायचं आहे.` रिटा देवी आयुष्यातला प्रत्येक टप्पा पार करत आहेत आणि आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत काम करण्याचा त्यांचा संकल्प आहे.