कोरोना व्हायरसचं संक्रमण मोठ्या प्रमाणात आढळून आल्यानं दिल्लीच्या निजामुद्दीन मर्कझ येथील मशिदीतील तबलिगी जमात सध्या खूप चर्चेत आहे. जाणून घेऊयात हे लोक कोण आहेत आणि नक्की काय काय काम करतात...
तबलिगी जमातीची सुरुवात 1926 मध्ये मेवात प्रांतात झाली. या जमातीची स्थापना मौलाना मुहम्मद इलियास यांनी केली होती. या जमातीचं मुख्य काम हे संपूर्ण जगभरात इस्लामचा प्रचार आणि प्रसार करणं हे आहे.
तबलिगी जमातीच्या मार्गदर्शनाखाली या जमातीतील लोक देशांच्या वेगवेगळ्या भागात जाऊन इस्लामचं ज्ञान आणि इस्लाम आचरणात आणण्याचे शिक्षण देतात.
या जमातीचं मुख्यालय अर्थात हेडक्वार्टर ‘बंगलेवाली मस्जिद’ जिला निजामुद्दीन मर्कझ म्हटलं जातं या ठिकाणी आहे. हे त्यांचं ग्लोबल सेंटर आहे. जगातल्या 150 देशात या जामातीचे लोक राहतात. 15 ते 25 कोटी लोक या जमातीचं आचरण करतात.
या जमातीचं आचरण करणाऱ्यांमध्ये जगातले बरेच नामवंत चेहरे आहेत. ज्यात भारताचे माजी राष्ट्रपती झाकीर हुसैन, मौलाना तारिक जमील, पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी आणि सईद अन्वर यांचा समावेश आहे.
जगात कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढत असताना अनेक देशांत या जमातीच्या शिबीरांचं आयोजन केलं जात होतं. मलेशिया आणि इंडोनेशिया सारख्या देशांचा यात समावेश आहे.
मलेशियामध्ये या जमातीतील 600 पेक्षा जास्त लोक कोरोना संक्रमित आहेत. तसेच भारतातही या जमातीतील लोकांमध्ये कोरोनाचं संक्रमण वाढताना दिसत आहे.