एका तरुणाने हातात पिस्तुल घेऊन फेसबुकवर काही फोटो अपलोड केले आहेत. फोटोसोबत त्या तरुणाने गुंडागिरीसाठीचं दरपत्रकही सोशल मीडियावर जारी केलं आहे. यात त्याने एखाद्याला धमकी देणं, मारामारी करणं, जखमी करणं आणि हत्या करण्यासाठी किती पैसे घेतले जातील, याची संपूर्ण लिस्टच पोस्ट केली आहे. गुंडागिरीची ही रेट लिस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.
गुंडागिरीचं दरपत्रक अर्थात कोणत्या कामासाठी किती पैसे घेतली जातील याची रेट लिस्ट तरुणाने पोस्ट केली आहे. यात एक हजार रुपयात धमकी देणं, 5 हजारात मारामारी, 10 हजारात जखमी करणं आणि 55 हजार रुपयात हत्या करणं, असं दरपत्रक पोस्ट करण्यात आलं आहे.
सोशल मीडियावर गुंडागिरी करण्यासाठी अशाप्रकारे खुलेआम रेट लिस्ट जाहीर करण्याचं हे कदाचित पहिलंच प्रकरण असावं. या तरुणाच्या पोस्टच्या आधारे पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
पोलिसांना चौकशीदरम्यान, हा तरुण मुजफ्फरनगरमधील जनपद येथील चरथावल पोलीस ठाणे भागातील चौकडा गावाचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
सीओ कुलदीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंटरनेटवर हातात पिस्तुल घेऊन गुंडागिरीचं प्रकरणं निदर्शनास आलं असून याप्रकरणी तपास सुरू आहे. लवकरच याप्रकरणी कारवाई केली जाईल. फोटोमध्ये दिसणारा तरुण पीआरडी जवानाचा मुलगा असल्याची माहिती असून, याबाबत अधिक तपास सुरू आहे.