

इंदौरच्या दगडफेकीत जखमी झालेल्या असूनही कोरोना तपासणी टीममध्ये असलेल्या 2 महिला डॉक्टर दुसऱ्या दिवशी लगेचच आपल्या ड्यूटीवर परतल्या आहेत.


डॉ तृप्ती कटारिया आणि डॉ झाकिया सय्यद यांनी पुन्हा एकदा नव्या दमानं कोरोना व्हायरच्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्याच्याला कामाला वाहून घेतलं आहे.


दोन्ही डॉक्टर पुन्हा एकदा दगडफेक झालेल्या भागात परतल्यावर तिथल्या नागरिकांनी, तुम्ही आम्हाला बहीणी सारख्या आहात आमच्याकडून चूक झाली असं म्हणत त्यांची माफी मागितली आहे.


डॉक्टर तृप्ती या हल्ल्याविषयी बोलताना म्हणाल्या, आम्ही त्यां ठिकाणी गेलो त्यावेळी जवळपास शंभर-दिडशे लोक अचानक आमच्या समोर आले आणि मारा-मारा म्हणून ओरडू लागले. त्यांनी आमच्यावर दगडफेक करायला सुरुवात केली.


डॉक्टर तृप्ती म्हणाल्या, हे सर्व घडल्यावर मी खूप घाबरले होते. आमची टीम त्या भागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी गेली होती. आम्ही जसं त्या लोकांकडे चौकशी करायला गेलो तसं त्या लोकांनी आमच्यावर दगड मारायला सुरुवात केली.


जर आमच्या सोबत पोलीसांची टीम नसती तर त्या लोकांपासून बचाव करणं शक्यच नव्हतं असंही डॉक्टर तृप्ती यांनी सांगितलं.


इंदौरमध्ये गुरुवारी 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले. आता इंदौरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 89 झाली आहे.