सहारनपूरच्या सावंत खेडी गावचे माजी प्रमुख जगपाल सिंग यांनी समाजासमोर वेगळा आदर्श उभा केला आहे. त्यांनी आपल्या विधवा सुनेचा मोठ्या थाटामाटात पुनर्विवाह करून दिला. सिंग यांनी आपल्या विधवा सुनेचे लग्न तर केलेच, पण मुलीप्रमाणे 'कन्यादान' करून तिची पाठवणी केली. या स्तुत्य निर्णयामुळे संपूर्ण परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
सहारनपूरच्या बुडगाव शहरातील सावंत खेडी गावचे माजी प्रमुख जगपाल सिंह यांचा मुलगा शुभम राणा याचे लग्न 2021 मध्ये मेरठ जिल्ह्यातील सलावा गावात राहणाऱ्या मोनाशी झाले होते. मात्र, घरात लग्नाचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. लग्नाच्या तीन महिन्यांनंतर शुभमने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मुलाच्या मृत्यूनंतर जगपाल सिंग यांचे दु:ख वाढले. त्यांना आपल्या सुनेच्या भविष्याची काळजी वाटू लागली. त्यांनी सुनेला आपल्या मुलीचा दर्जा दिला आणि कुटुंबीयांशी चर्चा करून तिचा पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला.
याबाबत त्यांनी आपल्या सुनेचेही मत घेतले. सुनेने होकार दिल्यावर त्यांनी हरियाणातील गोलनी येथे राहणारा सागर याच्याशी आपल्या सुनेचे नाते निश्चित केले. सागरच्या कुटुंबासोबत पूर्वीपासूनच नातेसंबंध होते. नात्याने ते जगपाल सिंग यांचे भाचे आहेत. 4 डिसेंबर रोजी वऱ्हाडी आले आणि सराहानपूर शहरातील एका बँक्वेट हॉलमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न पार पडले.