दर महिन्याच्या सुरुवातीला सामान्य माणसाच्या जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या नियमात बदल होतात. काही गोष्टी नव्याने लागू होतात. मार्च 2021 मध्ये (Rules Changing from 1st March 2021) देखील काही बदल होत आहेत. कोरोना व्हॅक्सिन (Coronavirus Vaccine) मिळण्याचा पुढील टप्पा आजपासून सुरू होत आहे, शिवाय एलपीजीच्या नव्या किंमती लागू होतील तसंच काही राज्यांमध्ये प्राथमिक शाळा देखील सुरू होत आहेत.
1. वयस्कर आणि आजारी व्यक्तींना मिळणार कोरोना लस- आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा आजपासून लागू होणार आहे. 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठांना आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना कोरोना लस मिळणार आहे. 1 मार्चपासून कोरोना व्हायरस लसीकरणाचा (Coronavirus Vaccination Drive) हा पुढील टप्पा सुरू होत आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये तुम्हाला ही लस मोफत मिळेल तर खाजगीमध्ये काही शुल्क आकारले जाणार आहे.
2. बँक ऑफ बडोदामध्ये होतोय हा बदल- विजया बँक (Vijaya Bank) आणि देना बँकेचा (Dena Bank) आयएफएससी (IFSC Code) कोड आजपासून निष्क्रिय होईल. या बँकांच्या ग्राहकांना नवीन IFSC कोड वापरावा लागणार आहे. बँक ऑफ बडोदामध्ये (Bank of Baroda) या दोन्ही बँका विलिन झाल्यामुळे ग्राहकांना या बदलाला सामोरे जावे लागणार आहे. बँकेने याबाबतची पूर्वसूचना ग्राहकांना दिली आहे. हे विलिनीकरण 1 एप्रिल 2019 पासून लागू झाले आहे. आता या दोन्ही बँकांचे ग्राहक BoB चे ग्राहक आहेत.
3. या राज्यात उघडणार प्राथमिक शाळा- देशातील तीन राज्यांमध्ये आजपासून शाळा उघडत आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सर्व प्राथमिक शाळा (पहिली ते पाचवी) 1 मार्चपासून उघडत असून हरियाणामध्ये ग्रेड 1 आणि 2 साठी नियमित वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हरियाणामध्ये तिसरी ते पाचवीसाठी शाळा आधीच उघडल्या आहेत.