एका सहकारी दूध डेअरीकडून चालवली जाणार असलेली देशातली पहिली सैनिकी शाळा गुजरातमध्ये सुरू होणार आहे.
चार जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व्हर्च्युअल पद्धतीने या सैनिकी शाळेचं उद्घाटन करणार असून, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह अन्य मंत्री त्या कार्यक्रमाला उपस्थित असतील.
मेहसाणा शहरापासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरियावी गावात 11 एकर क्षेत्रावर श्री मोतिभाई आर. चौधरी सागर सैनिक स्कूलची उभारणी होत आहे.
दूधसागर डेअरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या मेहसाणा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून या शाळेची उभारणी केली जात आहे.
ही डेअरी गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड अर्थात अमूल या प्रसिद्ध ब्रँडशी संलग्न आहे. या सैनिकी शाळेच्या उभारणीसाठी अंदाजे 75 कोटी रुपये खर्च येणार असल्याचा अंदाज आहे.
एखाद्या सहकारी संस्थेकडून व्यवस्थापन होणार असलेली ही देशातली पहिली सैनिकी शाळा असेल, असं अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
1960मध्ये स्थापन झालेली दूधसागर डेअरी देशातल्या सर्वांत मोठ्या सहकारी डेअरीजपैकी एक असून, मेहसाणा जिल्ह्यातल्या सहकारी दूधसंघांची जिल्हा पातळीवरची शिखर संस्था आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, आरोग्यमंत्री हृषीकेश पटेल, उद्योगमंत्री बलवंतसिंह राजपूत, सहकारमंत्री जगदीश पांचाळ यांच्या उपस्थितीत सैनिकी शाळेची पायाभरणी केली जाणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या व्हर्च्युअली या कार्यक्रमाला उपस्थित असतील. शाळेची उभारणी पूर्ण झाल्यानंतर दूधसागर संशोधन आणि विकास संघटना अर्थात DURDA या दूधसागर डेअरीच्या यंत्रणेकडून शाळेचं व्यवस्थापन पाहिलं जाणार आहे.
या सैनिकी शाळेच्या उभारणीला केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने ऑगस्ट 2022मध्ये परवानगी दिली. 2022-23 या शैक्षणिक वर्षात 46 मुलं आणि 4 मुली अशा 50 जणांना प्रवेश देण्यात आला.
सध्याच्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशक्षमता वाढवून 80 करण्यात आली असून, 10 टक्के जागा मुलींसाठी राखीव आहेत. सध्या या विद्यार्थ्यांची नोंदणी मेहसाणातल्या मानसिंगभाई इन्स्टिट्यूट ऑफ डेअरी अँड फूड टेक्नॉलॉजी या संस्थेत केली जात आहे.