OMG! एक-दोन नव्हे या अंगठीत आहेत 12638 महागडे हिरे, भारतातील या दागिन्याची गिनीज बुकमध्ये नोंद
मेरठ : प्रेम व्यक्त करण्याचे पारंपारिक प्रतीक मानला जाणारा दागिना म्हणजे अंगठी. भारतीय परंपरेतदेखील या दागिन्यास अनन्यसाधारण महत्व आहे. अशीच एक अंगठी जागतिक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. ही अंगठी 12638 हिऱ्यांपासून बनवण्यात आली असून याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.


उत्तर प्रदेशमधील मेरठ (Meerut) याठिकाणचे युवा ज्वेलरी डिझायनर हर्षित बन्सल यांनी 12638 हिऱ्यांचा वापर करुन एका आकर्षक अंगठीची निर्मिती केली आहे. त्यामुळे हर्षित यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे. या अनोख्या अंगठीला पाहून जगभरातील लोकं आश्चर्य व्यक्त करीत आहेत.


मेरठ येथील प्रसिध्द सराफ मेसर्स रेनानी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक हर्षित बन्सल यांनी सांगितले की 12638 हिऱ्यांचा वापर करुन ही अंगठी तयार करण्यात आली आहे. ही अंगठी तयार करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. या यशाची नोंद गिनीज बुकमध्ये झाल्याने मेरठ येथील सराफ बाजार जागतिक स्तरावर पोहोचला आहे. नुकताच हर्षित यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत अंगठीचा फोटो शेअर केला आहे.


हर्षित हे जगातील असे एकमेव व्यक्ती बनले आहेत की ज्यांनी एक अंगठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिऱ्यांचा वापर करुन सजवली आहे. 30 नोव्हेंबर 2020 ला त्यांनी या जागतिक विक्रमाची नोंद केली. लंडनमधील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने याची नोंद जागतिक विक्रमांमध्ये केली आहे.


विशेष म्हणजे हर्षित यांनी ही अंगठी एक छंद म्हणून बनवली आहे. त्यांनी या अंगठीची निर्मिती करुन हैदराबाद येथील श्रीकांत यांचा विक्रम मोडला आहे. श्रीकांत यांनी गोलाकार अॅब्सट्रॅक डिझाईनमध्ये 7801 हिऱ्यांचा वापर करुन अंगठी तयार केली होती. मात्र हर्षित यांनी यापेक्षा अधिक हिऱ्यांची वापर करीत श्रीकांत यांचा रेकॉर्ड मोडला आहे. त्यांच्या यशामुळे त्यांचे कुटुंबीय आणि सराफ व्यवसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लवकरच वर्ल्ड रेकॉर्डची टीम भारतात येऊन हर्षित यांना सन्मानित करणार आहे.


हर्षित यांनी सांगितले, की या अंगठीत 8 स्तर असून त्यातील 138 पाकळ्यांवर हिरे बसवण्यात आले आहेत. हर्षित यांना ही अंगठी तयार करण्यासाठी सुमारे अडीच ते तीन वर्षांचा कालावधी लागला आहे. हर्षित यांनी या अंगठीचे डिझाइन तयार केले तर सूरतमध्ये कंपनीच्या 28 कर्मचाऱ्यांनी ही अंगठी तयार केली आहे.


द मेरिगोल्ड डायमंड रिंग नावाच्या या अंगठीचे वजन 165.450 ग्रॅम असून हिऱ्यांचे वजन 38.08 कॅरेट आहे. 18 कॅरेट शुध्द सोन्यात ही अंगठी साकारण्यात आली आहे. अंगठीला 8 स्तर असून 138 पाकळ्यांचे आकार देण्यात आले आहेत. प्रत्येक स्तर हा हिरेजडीत आहे. यातील सगळे हिरे एकाच आकाराचे आहेत. या अंगठीचा आकार 3 इंच रुंद आणि 1.75 इंच उंच आहे. महिला ही अंगठी आरामात वापरु शकतात, असे हर्षित यांचे म्हणणे आहे.


या अंगठीच्या संरक्षणासाठी हर्षित यांनी विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे. हर्षित हे कस्टमाईज दागिन्यांचा व्यापार करतात. सूरत व मुंबई येथून त्यांनी ज्वेलरी डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. मेरठ येथील एनआयजेटी येथून त्यांनी हिऱ्यांच्या ग्रेडिंगचं शिक्षण घेतले आहे. 25 वर्षांचे हर्षित यांनी मेरठ येथील दागिन्यांना जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळवून दिली आहे.