इंफाळमधील इमा मार्केट ज्याला मदर्स मार्केट देखील म्हटलं जातं ते महिलांद्वारे चालवण्यात येणारं सर्वात मोठं मार्केट आहे. याठिकाणी साधारणत: 5000-6000 पेक्षा जास्त महिला दुकानदार आहेत. एक सर्वात जुना बाजार म्हणून याचं वेगळं महत्त्व आहे. हे मार्केट महिलांद्वारेच चालवलं जातं. या मार्केटच्या प्रशासनासाठी महिलांची यूनियन देखील आहे. या परिसरात एका वर्षी आलेल्या भुकंपामुळे मार्केटची अवस्था दयनीय झाली होती, मात्र आता दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा याठिकाणची गर्दी वाढली आहे. याठिकाणी दररोज लाखोंचा व्यवहार होतो.
या बाजाराला खैरबंद बाजार किंवा नुपी कैथल देखील म्हटलं जातं. मणिपुरीमध्ये याला इमाकैथिल मार्केट म्हटलं जातं. अनेक महिला याठिकाणी पीढीजात दुकान चालवत आहेत. हँडिक्राफ्ट सामान, खेळणी, कपडे, सौंदर्य प्रसाधनं, खाण्याचं सामान, मसाले, भाज्या, मांस इ. गृहपयोगी वस्तूंची याठिकाणी विक्री होते. या बाजारात पुरुषांची विशेष अशी कोणतीच भूमिका नाही आहे.
सुरुवातीला हा बाजार शेड्स वापरुन भरत असे, आता इंफाळ म्युनिसिपलने याठिकाणी चार मजली इमारत बांधली आहे. हा बाजार शेकडो वर्ष जुना आहे, मणिपूर गॅजेटिअरमध्ये 1786 मध्ये महिला बाजार असा याचा उल्लेख आढळतो. त्यावेळी देखील असा उल्लेख आहे की महिलांद्वारे हा बाजार भरवला जात आहे.
बीबीसीच्या एका अहवालानुसार, कदाचित हे मार्केट पूर्णपण महिलांद्वारे याकरता चालवले जाते कारण मणिपूरच्या मैती समुदायातील पुरुष मोठ्या संख्येने चिनी आणि बर्मी यांच्याशी लढाईमध्ये असत. त्यामुळे महिलांवर कुटुंबाची जबाबदारी होती. याठिकाणी केवळ आर्थिक व्यवहार नाही तर महिलांकडून राजकीय भूमिका देखील घेतली जाते
1948-52 दरम्यान काही स्थानिक श्रीमंत लोकं अन्य काही व्यापाऱ्यांसह मिळून या बाजारातील शेड्स पाडणार होते. मात्र महिलांनी त्यांचा हा मनसुबा यशस्वी होऊन दिला नाही. याठिकाणी बाजारात दुपारच्या जेवणाच्या वेळी महिलांकडून सामाजिक-आर्थिक विषयांवर चर्चा देखील होते. एवढंच नव्हे तर बाजारातील दुकानदार महिला इतर महिलांना जागरूक व सशक्त बनवण्याचे कामही करतात. मणिपूरमध्ये, इतर राज्यांपेक्षा महिला अधिक संपन्न आणि पुरुषांपेक्षा पुढे आहेत.
याठिकाणी काही जागी विधवांना किंवा एकट्या राहणाऱ्या महिलांना दुकानासाठी जागा देण्यात आली आहे. हा बाजार प्रसिद्ध असल्याने पर्यटकांची देखील ये-जा असते. याठिकाणी दुकानदार महिला अधिकतर पारंपरिक वेशात असतात. आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करता येईल, इतकी कमाई या महिला या बाजारातून करतात.
विविध वयोगटातील महिला दुकानदार या बाजारात आहेत. स्टॉल्स आणि त्यांच्या भाड्यामध्ये देखील विविधता आहे. मात्र यूनियनकडून असा प्रयत्न केला जातो की या स्टॉल्सचं भाडं नियंत्रित केलं जाईल आणि गरजवंत महिलांना संधी मिळेल
असं म्हटलं जातं की हा बाजार 500 वर्ष जुना आहे. त्यामुळे याठिकाणी महिला दुकानदारांमध्ये अनेकदा वादविवादही पाहायला मिळाले आहेत. 1891 मध्ये जेव्हा ब्रिटिश काउन्सिल प्रशासनाने मणिपूरवर आर्थिक आणि राजकीय सुधारणांची अंमलबजावणी केली तेव्हा बाजाराच्या कामकाजावर त्याचा वाईट परिणाम झाला होता. मग ब्रिटिशांनी मनमानी करत स्थानिक गरजा जाणून घेतल्याशिवाय याठिकाणी उत्पादन न होणारं धान्य विकण्यास सुरुवात केली. यामुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. मग या बाजाराच्या महिलांच्या नेतृत्वात लढा दिला गेला. मग ब्रिटिशांनी हा बाजार परदेशी किंवा बाहेरील लोकांना विकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देखील स्त्रियांनी जोरदार विरोध केला होता. जेव्हा जपानने भारतावर आक्रमण केलं तेव्हा इंग्रजांनी मणिपूरमध्ये त्यांच्या अशी चुकीच्या व्यवहारांना थांबवले होते.