मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये यंदा फेमिना मिस इंडिया स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात नंदिनी विजेती ठरली. ती जिंकल्यामुळे तिच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. नंदिनीचे आई-वडील आणि छोटी बहीण तिच्यासोबत मणिपूरमध्येच आहेत, तर इतर नातेवाईक कोटामध्ये मिठाई वाटून आनंद साजरा करत आहेत.
राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात रामपुरा भागात असलेल्या जुन्या भाजी मंडई परिसरात नंदिनी तिच्या कुटुंबीयांसोबत राहते. तिचे वडील सुमित गुप्ता बिल्डर असून शेतीही करतात. आई रेखा गुप्ता गृहिणी आहे. नंदिनीची छोटी बहीण अनन्या गुप्ता सध्या शिक्षण घेत आहे.
नंदिनीने मुंबईतून बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचं शिक्षण घेतलं आहे. त्याआधीचं शिक्षण तिनं कोटातल्या माला रोडवर असलेल्या मिशनरी शाळेतून घेतलं आहे. नंदिनीचे वडील सुमित गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, गेले 45 दिवस ही स्पर्धा सुरू होती. मणिपूर पर्यटन विभागाने स्पर्धेचं आयोजन केलं होतं.
नंदिनीने 3-4 वर्षांची असतानाच मिस इंडिया स्पर्धेत सहभागी होण्याचं स्वप्न पाहिलं होतं, असं तिच्या वडिलांचं म्हणणं आहे. तेव्हापासून ती कॅटवॉक करायची व टीव्हीवर ते कार्यक्रम पाहायची. विशेष म्हणजे नंदिनीने यासाठी कोणतेही क्लास लावले नाहीत किंवा प्रशिक्षण घेतलं नाही.
नंदिनीच्या मते फेमिना मिस इंडिया ही केवळ सुरुवात आहे. यापुढे मिस युनिव्हर्सचा मुकुट मिळवणं हे तिचं स्वप्न आहे. जशी संधी मिळेल, तसं चित्रपट क्षेत्रात नक्की काम करणार असल्याचं तिनं सांगितलंय.
एखाद्या ब्रँडचं प्रमोशन, ब्रँड अँबेसेडर किंवा चित्रपटात करिअर करणं या सगळ्याचा ती विचार करते आहे. कारण याआधी ती केवळ स्पर्धक होती; मात्र आता ती फेमिना मिस इंडिया बनली आहे. तिच्यासाठी करिअरचे अनेक पर्याय आता खुले झाले आहेत.
फेमिना मिस इंडिया स्पर्धा 45-50 दिवस सुरू होती. यात जवळपास सगळ्या राज्यांमधून स्पर्धक आले होते. त्या सगळ्यांना मागे टाकत नंदिनी गुप्ता हिने मान पटकावला. याआधीची मिस इंडिया सिनी शेट्टी हिने नंदिनीला मुकुट घातला. दिल्लीची श्रेया पूंजा फर्स्ट रनर अप, तर मणिपूरची थौनाओजम स्ट्रेला लुवांग सेकंड रनर अप ठरली.