जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला गेला. त्यानिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएन कार्यालयाबाहेर योग दिन साजरा केला. यावेळी अमेरिकेतील भारतीय नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली योग दिनाच्या कार्यक्रमादरम्यान गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला.
या कार्यक्रमादरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाच्या उच्चस्तरीय अधिकार्यांसह, विविध देशांचे राजनैतिक अधिकारी आणि जगभरातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. यामुळेच या योगशाळेचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या राजदूत रुचिरा कंबोज यांनी सांगितले की, योग दिनाच्या कार्यक्रमात 191 देश सहभागी झाले होते.
एका योग सत्रात विविध देशांतील लोकांच्या सहभागाशी संबंधित हा विक्रम आहे. दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयाबाहेर भाषण केलं.
पंतप्रधान मोदी म्हणाले, जगभरातील सर्व देशातील लोकं इथे उपस्थित होते. 9 वर्षांपूर्वी आम्ही योग दिवस सुरू केला. योगाचा अर्थ हा सर्वांना एकजूट करणं हा आहे. योग हा भारतातून आला असून जुनी परंपरा आहे. यावर कोणाचाही कॉपीराईट नाही, असंही पंतप्रधान मोदी म्हणालेत.
तसेच योग हा सर्वांसाठी आहे, योग हा आयुष्याचा भाग असल्याचंही मोदी म्हणाले. यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिवसासाठी "वसुधैव कुटुंबकम" ही संकल्पना आहे.