भारताचा हजारो वर्षं जुना इतिहास व त्याची साक्ष देणारी इथली काही ऐतिहासिक ठिकाणं यांना भेट देण्यासाठी परदेशातून अनेक पर्यटक दर वर्षी भारतात येतात. भारतीय प्रथा-परंपरांपैकी लग्नसंस्काराचं अनेक पाश्चिमात्यांना आकर्षण वाटतं. काही जण कुतुहल म्हणून, तर काही जण खरोखर लग्नसंस्कार समजून घेऊन भारतीय पद्धतीनं विवाह करतात. अशाच एका परदेशी दाम्पत्यानं भारतात येऊन आग्र्याच्या ताजमहालाजवळ हिंदू पद्धतीनं विवाह केला.
अमेरिकेत राहणारे गेराड सॅम्युअल आणि त्यांची पत्नी करोलाईन सॅम्युअल त्यांच्या लग्नाच्या 30व्या वाढदिवसानिमित्त नुकतेच भारतात आलेत. त्या वेळी त्यांनी अनोख्या पद्धतीने लग्नाचा वाढदिवस साजरा केला. त्यांनी चक्क हिंदू पद्धतीनं विवाह करून जन्मोजन्मी एकत्र राहण्याचं वचन एकमेकांना दिलं.
आग्र्याचा ताजमहाल प्रेमाचं प्रतीक समजला जातो. अनेक प्रेमिक इथं येऊन प्रेमाची कबुली देतात व आणाभाका घेतात. पर्यटकांमध्येही ताजमहालाबाबत प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळेच अमेरिकेच्या गेराड सॅम्युअल यांनी सपत्नीक या ठिकाणी भेट देऊन भारतीय पद्धतीनं लग्न केलं.
गेराड सॅम्युअल अमेरिकेचे नागरिक आहेत, तर त्यांची पत्नी करोलाईन सॅम्युअल इंग्लंडच्या रहिवासी आहेत. त्यांच्या लग्नाला 30 वर्षं झाली आहेत. लग्नाचा 30वा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते भारतात आले आहेत. त्यांची हिंदू पद्धतीनं लग्न करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी गुरुजी बोलावून विधिवत लग्न केलं. भगवान शंकरांच्या साक्षीनं हा विवाहसोहळा झाला. एकमेकांना वरमाला घालून दोघांनीही भगवान शंकरांचा आशीर्वाद घेतला.
आग्र्याच्या प्रेमनगरीत येऊन हिंदू पद्धतीनं विवाह करण्याची त्या दोघांचीही खूप वर्षांपासून इच्छा होती. आता त्यांनी लग्नाच्या 30व्या वाढदिवशी ती इच्छा पूर्ण केली. एकत्र सप्तपदी चालून कायम एकमेकांसोबत राहण्याचं वचन देऊन त्यांनी लग्न केलं. वास्तविक जोडप्यातला एक जोडीदार भारतीय असेल, तरच भारतीय पद्धतीनं लग्न केलं जातं; मात्र या जोडीचं वैशिष्ट्य असं, की त्यांच्यापैकी कोणीही भारतीय नसूनही त्यांना हिंदू विवाहसंस्कार करण्याची इच्छा होती.