

आजबाजूला घडणाऱ्या घटनांबाबत प्रत्येकजण सतर्क राहायला लागला आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. 4 वर्षांच्या चिमुकल्याच्या सायकलची घंटी चोरीला गेल्यानं मोठी खळबळ उडाली.


या चिमुकल्यानं ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगितली आणि त्याने थेट न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं. आपल्या हरवलेल्या घंटीची तक्रार करण्यासाठी या चिमुकल्याला आलेलं पाहून पोलीसही 2 मिनिटांसाठी थबकले.


मिळालेल्या माहितीनुसार, हल्का बस्सी पठाना इथल्या मुहल्ला पुरा येथे राहणार्या राजन वर्माच्या घराबाहेर उभे असलेल्या त्याच्या 4 वर्षाच्या मुलाच्या सायकलची घंटी कुणीतरी चोरी केली. ध्रुव जेव्हा घराबाहेर पडला तेव्हा त्याला आपल्या सायकलला घंटी नसल्याचं लक्षात आलं. तो धावत घरात गेला आणि ही बाब त्यांनं वडिलांच्या कानावर घातली.


वडिलांनी त्याला समजवलं मात्र ध्रुव ऐकायला तयार नव्हता. आपण या गोष्टीची तक्रार पोलिसात करूया असा तगादा त्याने लावला. वडिलांनी अखेर त्याचं म्हणणं मान्य केलं आणि त्याच्यासोबत पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी गेले.


पोलिसांनी या चिमुकल्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याला चोर लवकर शोधून काढू असं आश्वासनही दिलं. वडिलांनी घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला आणि पोलिसांनी देखील या 4 वर्षांच्या चिमुकल्याला त्याची सायकलची बेल शोधून देण्यात मदत करण्याचं आश्वासन दिलं.