हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या सात जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. उद्याचा दिवस हा पावसासाठी फार महत्त्वाचा आहे.
या अलर्टनंतर प्रशासनही सतर्क झालं आहे. काही ठिकाणी खरंच नद्यांना पूर आल्यासारखी परिस्थिती आहे. पालघर जिल्ह्यासाठी 7 ऑगस्टसाठी येल्लो अलर्ट देण्यात आला होता. पण त्यानंतर पुढच्या चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचाच अर्थ आतापासून पुढचे चार दिवस पालघर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे आहे.
आगामी तीन दिवसांमध्ये पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे पालघर सारखाच येल्लो अलर्ट हा ठाणे आणि मुंबईसाठी देण्यात आला आहे. त्यानंतर पुढचे चार दिवस हे ऑरेंज अलर्ट सांगण्यात आले आहेत. मुंबईसाठी फक्त 11 ऑगस्टला परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तर कोकणात पाऊस प्रचंड धुमाकूळ घालत आहे. कोकणात तर तो धुवाँधार कोसळत आहे. त्याचं हे कोसळणं आज आणि उद्या सारखंच असणार आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पाऊसही प्रचंड पडतोय. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात 9 ऑगस्टपासून ऑरेंज अलर्ट असणार आहे.
धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता कमी आहे. तर त्यापुढच्या तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिथे फार काही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात 9 किंवा 10 ऑगस्टसाठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर इतर दिवसांसाठी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी पुढचे तीन दिवस येल्लो अलर्ट तर 10 ऑगस्टसाठी ऑरेंज अलर्ट आणि 11 ऑगस्टसाठी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यासाठी 10 आणि 11 ऑगस्टसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. एकंदरीतच अर्ध्या महाराष्ट्राला 3 दिवसांसाठी मुसळधार इशारा देण्यात आला आहे.