
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत कोरोनाचा धोका कायम आहे. मात्र काही लोक अजुनही मास्क वापरण्यात कुचराई करत आहेत. अशा लोकांना चाप लावण्यासाठी महापालिकेने(BMC) दंडाची रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.

मास्क न घातल्यास आधी 200 रुपये दंड केला जात होता. आता ही रक्कम दुप्पट करण्यात आली असून आता 400 रुपये दंड भरावा लागणार आहे.

महापालिका मुंबईकरांना मास्क वापरण्यासाठी आवाहन करत आहे. परंतु अनेक मुंबईकर मास्कचा वापर करत नाहीत त्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

मुंबईकरांनी सरकारच्या सर्व नियमांचं पालन करावं असं आवाहन मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केलं आहे.

जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही तोपर्यंत मास्कचा वापर करणं हे अत्यावश्यक आहे असं जगभरातल्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणे या तीन गोष्टींमुळेच कोरोनाला दूर राखता येतं हे आता सिद्ध झालं आहे.

त्यामुळे आपला आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी मास्कचा वापर करा असं आवाहन मुंबई महानगर पालिकेने केलं आहे.




