उन्हाचा कडाका यंदा अधिक वाढल्यानं एअर कंडिशनरची (एसी) मागणीही वाढली आहे. मात्र, एसीच्या किंमतीही 30-35 हजाराच्या आसपास असल्यानं अनेकदा तो विकत घेणं सर्वसामान्यांना शक्य होत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही एसी हा काही काळासाठी रेंटवर म्हणजेच भाड्यानं घेऊ शकता. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलंय.
नवीन एसी खरेदी न करता तो भाड्यानं घेणं अनेकजण पसंत करतात. पण एसी भाड्यानं नेमका कुठे मिळतो, त्याची योग्य जागा माहिती नसते. मात्र तुम्हाला माहिती आहे का, अशा अनेक वेबसाइट्स आहेत, ज्या भाड्यानं एसी देतात.
एसी भाड्यानं घेताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण भाड्यानं दिले जाणारे एसी जुने असतात, त्यामुळे लाईट बिल जास्त येऊ शकतं. अशा परिस्थितीत एसी भाड्यानं घेताना त्याचे स्टार रेटिंग आणि तो किती जुना आहे, हे लक्षात घ्यावं.
तुमच्या जवळच्या, शहरातील काही दुकानांमध्येसुद्धा एसी भाड्यानं देण्याची सुविधा असू शकते. अशा दुकानांचा शोध घेऊन तुम्ही तेथून भाड्यानं एसी घेऊ शकता.
विविध वेबसाइट भाड्यानं एससी देण्याची सुविधा देतात. अशीच एक वेबसाइट rentpelelo.com आहे. यावर तुम्हाला एसीचे अनेक पर्याय मिळतील. या वेबसाइटवरून तुम्ही मासिक भाडं देऊन एसी घेऊ शकता. वेबसाइट 1.5 टन विंडो एसीसाठी दरमहा 777 रुपये भाडे आकारत आहे. म्हणजेच 6 महिन्यांसाठी तुम्हाला 5 हजारांपेक्षा कमी खर्च करावा लागेल.
कंपनी भाड्यानं एसी देण्यासोबत सिक्युरिटी डिपॉझिटही घेते. जर तुम्ही rentpelelo.com वरून विंडो एसी 6 महिन्यांसाठी भाड्यानं घेत असाल, तर तुम्हाला सुमारे 6500 रुपयांचं सिक्युरिटी डिपॉझिट द्यावं लागेल. येथे तुम्हाला एसीचे अनेक पर्याय मिळतील. पण ऑनलाइन वेबसाइटवरून एखादा एसी भाड्यानं घेण्यापूर्वी काही गोष्टी तपासणं आवश्यक आहे. जसं की, एसीचं स्टार रेटिंग, मासिक भाडं, सिक्युरिटी डिपॉझिट आदी.
सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं घरात एसी असणं गरजेचं झालं आहे. पण जर तुम्ही घरापासून दूर राहत असाल किंवा भाडोत्री घरात राहत असाल, तर तुम्ही नवीन एसी खरेदी करून तो सेट करण्याऐवजी एसी भाड्यानं घेऊ शकता. जे तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायद्याचं ठरेल.